करजगावात दारूचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:12 IST2021-04-05T04:12:14+5:302021-04-05T04:12:14+5:30

करजगाव : शिरजगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या करजगावात सध्या दारूचा महापूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गावातील एकमेव ...

A flood of alcohol in Karjagaon | करजगावात दारूचा महापूर

करजगावात दारूचा महापूर

करजगाव : शिरजगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या करजगावात सध्या दारूचा महापूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गावातील एकमेव परवानाप्राप्त देशी दारूचे दुकान काही कारणास्तव बंद झाले आहे. याच स्थितीचा अचूक नेम साधत अवैध व्यावसायिक बिनधास्त दिवसाढवळ्या जोमाने दारू विक्री करीत आहे.

शिरजगाव, करजगाव तसेच स्वतंत्र पोलीस ठाणे असलेले ब्राम्हणवाडा थडी या गावात अवैध व्यावसायिक बिनधास्त व्यवसाय करताना दिसत आहे. प्रशासनाचा धाक, अधिकाऱ्याचा दरारा कुठेच निदर्शनास येत नाही. जोमात गावठी दारू, अवैध देशी, सागवान तस्करी, वाळू तस्करी, गुटखा विक्री जोमात सुरू आहे. काही महिन्यात पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात आयपीएस निकेतन कदम यांनी मोर्शी, रिद्धपूर, करजगावात १८ आक्टोबर रोजी केलेल्या तीन कारवाईत १८ लाख ६२ हजारांचा गुटखा जप्त केला. कारवाईला काही दिवस होत नाही तोच पुन्हा अवैध प्रतिबंधित गुटखा विक्री राजरोसपणे होत आहे. अवैध धंद्यांवर अंकुश लागेल का, असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. खुलेआम अगदी सहजपणे सुरू असलेल्या अवैध व्यवसायाने तरुण पिढी भरकटून व्यसनाच्या आहारी जात आहे. ग्रामीण भागात दुधाळ जनावरांची संख्या अधिक असून जितक्या सहज दूध उपलब्ध होत नाही, तितक्याच सहज दारू मिळत असल्याने प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

---------------

Web Title: A flood of alcohol in Karjagaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.