पाच वर्षांत राज्य दुष्काळमुक्त

By Admin | Updated: December 31, 2016 01:30 IST2016-12-31T01:30:28+5:302016-12-31T01:30:28+5:30

जलयुक्त शिवार योजनेतून दोन वर्षांत चार हजार गावे दुष्काळमुक्त करण्यात आली

In five years, the state is free of drought | पाच वर्षांत राज्य दुष्काळमुक्त

पाच वर्षांत राज्य दुष्काळमुक्त

मुख्यमंत्री : भाजप नवचेतना कार्यकर्ता संमेलन
अमरावती : जलयुक्त शिवार योजनेतून दोन वर्षांत चार हजार गावे दुष्काळमुक्त करण्यात आली असून येत्या पाच वर्षांत संपूर्ण राज्य दुष्काळमुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
भाजप ग्रामीणच्यावतीने येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात गुरुवारी आयोजित नवचेतना कार्यकर्ता संमेलनात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी मंचावर पालकमंत्री प्रवीण पोटे, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते व्ही. सतीश, अरुण अडसड, उपेंद्र कोठेकर, आ. चैनसुख संचेती, आ. सुनील देशमुख, आ. अनिल बोंडे, आ. प्रभुदास भिलावेकर, आ. रमेश बुंदिले, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यंवशी, निवेदिता चौधरी, एमआयडीसी असोशियएनचे अध्यक्ष किरण पातुरकर, माजी महापौर किरण महल्ले, भाजपचे शहराध्यक्ष जयंत डेहनकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सात नगरपालिका काबीज करून जिल्ह्याने भाजपचा नवा इतिहास लिहिला आहे. केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असून यावर सर्वसामान्यांचा विश्वास आहे. विदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादीचा सफाया झाला असून राज्यात नगरपालिकांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपवर शिक्कामोर्तब झाला आहे. राज्याचा कारभार हाताळताना दोन वर्षे पूर्ण झाली असून जलयुक्त शिवारमुळे चार हजार गावे दुष्काळमुक्त करण्यात आली आहेत. येत्या पाच वर्षांत राज्य दुष्काळमुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आघाडी सरकारच्या कार्यकाळात नियोजनाचा अभाव होता. त्यामुळे काँग्रेसच्या ७० वर्षांच्या राजवटीत सिंचन प्रकल्प पूर्ण होऊ शकले नाहीत. मात्र आता केंद्र सरकारने राज्याला १२ हजार कोटी रुपये दिले असून सिंचन प्रकल्पाच्या भूमिअधिग्रहणासाठी निधीची कमतरता भासणार नाही, ही बाब त्यांनी स्पष्ट केली. गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडविताना शेतकरी लक्ष्य करून मॉडेल सुविधा दिली जाईल. कृषिपंपांना वीज, गाव-खेड्यात विजेची समस्या दूर करण्यासाठी केंद्राने विदर्भाला दोन हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. त्यामुळे मेळघाटात १३२ केव्ही क्षमतेची विद्युत वाहिनी नेऊन दुर्गम भागात वीज पुरवठा करता येईल. नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत भाजप शासनाने मोठे १२ उद्योग आणले आहेत. कृषीला उद्योगाशी जोडण्याचे काम करायचे आहे. पुढील तीन वर्षात शेतकरी समृद्ध होईल. कनेक्टिव्हिटी, डिजिटायझेनद्वारे शिक्षण, आरोग्य यंत्रणा सक्षम करायची असून हाच प्रगतीचा मार्ग ठरेल. जागतिक बँकेने विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला असून चार हजार गावांत पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. विविध योजना सामान्यापर्यंत पोहोचत आहे. केंद्र व राज्य सरकारवर जनतेने शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुका काबीज करताना भाजप कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी नेत्यांमागे नव्हे, तर जनतेमागे फिरावे. उमेदवारी कोणाला, याचे सर्वेक्षण केले जाईल त्यानंतर उमेदवारीचा निर्णय होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचार, कॅशलेस व्यवहार व काळा पैसा आदींबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. (प्रतिनिधी)

Web Title: In five years, the state is free of drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.