पाच तालुक्यांत अतिवृष्टी
By Admin | Updated: September 19, 2015 00:11 IST2015-09-19T00:11:55+5:302015-09-19T00:11:55+5:30
बाप्पाच्या आगमनासोबत आलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली.

पाच तालुक्यांत अतिवृष्टी
पिके तरारली : परतीचा दमदार पाऊस
अमरावती : बाप्पाच्या आगमनासोबत आलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. सरासरी ६२.४ मि.मी.पाऊस पडला. यामध्ये पाच तालुक्यांत अतिवृष्टी झाली तर सहा तालुक्यांनी पावसाची अपेक्षित सरासरी ओलांडली आहे. प्रकल्पात सरासरी ९४.१५ टक्के जलसाठा आहे. धोक्याच्या पातळीवर असलेल्या दोन धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
जिल्ह्यात गुरुवार ते शुक्रवार सकाळपर्यंत ६२.०४ मि.मी. पाऊस पडला. यामध्ये अमरावती तालुक्यात ६७.८ मि.मी., नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १२७ मि.मी.,चांदूररेल्वे तालुक्यात ८५.७ मि.मी., तिवसा तालुक्यात ७४.४मि.मी. व चिखलदरा तालुक्यात ७०.७ मि.मी. पाऊस पडला. हा पाऊस ६५ मि.मी. पेक्षा अधिक असल्याने अतिवृष्टीमध्ये मोडतो. त्यामुळे महसूल यंत्रणेद्वारा पावसाच्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
भातकुली तालुक्यात ५३.३ मि.मी पावसाची नोंद झाली. धामणगाव ५५.७ मि.मी., मोर्शी ४२.२ मि.मी., वरुड ४१.४ मि.मी, अचलपूर ४१.८ मि.मी, चांदूरबाजार ५१.४ मि.मी., दर्यापूर ६४.७ मि.मी., अंजनगाव ५०.३ मि.मी. व धारणी तालुक्यात ४६.६ मि.मी. पाऊस पडला आहे. या पावसामुळे गणेश मंडळांची तारांबळ उडाली. परंतु हा पाऊस शेतकऱ्यांना सुखावणारा ठरला आहे. खरिपाच्या सोयाबीन, कपाशी व तूर पिकाला या पावसाने संजीवनी मिळाली आहे.