परतवाड्यातील पाच विद्यार्थी आज दिल्लीत मांडतील विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 19:54 IST2020-01-11T19:54:43+5:302020-01-11T19:54:51+5:30
आंतरराष्ट्रीय बाल वातावरण परिषद : १४ जणांची निवड; उर्वरित विद्यार्थ्यांचा कार्यशाळेत सहभाग

परतवाड्यातील पाच विद्यार्थी आज दिल्लीत मांडतील विचार
अनिल कडू
परतवाडा (अमरावती) : स्थानिक संस्कार इंटरनॅशनल स्कूलच्या १४ विद्यार्थ्यांची निवड आंतरराष्ट्रीय बाल वातावरण परिषदेसाठी (चिल्ड्रेन क्लाइमेट कॉन्फरन्स) करिता झाली आहे. त्यांच्यापैकी पाच विद्यार्थी जलवायू प्रेरक वक्ता (इन्स्पायरिंग क्लाइमेट स्पीकर) म्हणून आपले विचार या एक दिवसीय परिषदेत १२ जानेवारीला मांडणार आहेत.
दिल्ली येथील राष्ट्रीय बाल भवनात ही परिषद होत आहे. यात २० देशांचे एक हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातून १४४ विद्यार्थी निवडले गेले. परतवाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये विधी पुरोहित, वेदिका बारोले, मयंक खंडेलवाल, ईश्वरी वासनकर, समर्थ खंडेलवाल, पलक रावत, निमिषा घुलक्षे, रिचा येऊतकर, संचिता अग्रवाल, सात्विक जैन, वेद खंडेलवाल यांचा समावेश आहे. जलवायू प्रेरक वक्त्यांशिवाय उर्वरित नऊ विद्यार्थी परिषदेतील कार्यशाळेत भूजलवायुपूरक प्रेरणादायी मॉडेल मांडणार आहेत. या विद्यार्थ्यांसमवेत के.जी. - २ मधील अभिजय नीरज पाठक या परिषदेला गेला आहे.