आश्रमात आणखी पाच अपमृत्यू

By Admin | Updated: October 17, 2016 00:09 IST2016-10-17T00:09:00+5:302016-10-17T00:09:00+5:30

शंकर महाराज यांच्या पिंपळखुटा येथील आश्रमात प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या कोवळ्या मुलांचा नरबळी देण्याच्या...

Five more deaths in ashram | आश्रमात आणखी पाच अपमृत्यू

आश्रमात आणखी पाच अपमृत्यू

सत्यशोधन अहवाल : अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उलगडले धक्कादायक वास्तव
अमरावती : शंकर महाराज यांच्या पिंपळखुटा येथील आश्रमात प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या कोवळ्या मुलांचा नरबळी देण्याच्या प्रयत्नांपूर्वी आणखी पाच संशयास्पद मृत्यू झाल्याचे धक्कदायक वास्तव अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सत्यशोधन अहवालात नमुद करण्यात आले आहे.
समितीने या अहवालाच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्या आहेत. न्यायालयातही हा अहवाल सादर करण्यात आला आहे.
दि. १ सप्टेंबर २००६ ला सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान सागर दिवाकर पाथरे या तिवसा तालुक्यातील वरुडा येथील विद्यार्थ्याचा पिंपळखुटा येथील आश्रमात शॉक लागून संशयास्पद मृत्यू झाला. सागर हा आश्रमातील शाळेत इयत्ता दहावीत होता. सागरचा मोठा भाऊ रूपेश हादेखील आश्रमातच शिकत होता. आश्रमातील पूजाअर्चा, स्वच्छता राखणे, अशी कामे तो करायचा. घटना घडली त्यावेळी तो पूजा करीत होता. लहान भावाला विजेचा धक्का लागल्याचे त्याला सांगण्यात आले. धावतच त्याने घटनास्थळ गाठले. सागरला धुगधुगी होती. त्याला प्रथम अंजनसिंगी प्राथमक आरोग्य केंद्रात नेले गेले. नंतर धामणगावच्या खासगी इस्पितळात नेले गेले. प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी अमरावतीला नेण्यास सांगितले. अमरावतीच्या वाटेवरच सागरचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे संपूर्ण प्रकरण आश्रम व्यवस्थापनाने दडपले. या घटनेची पोलीस तक्रार नाही. शवविच्देछन करण्यात आले नाही. रूपेश पाथरेला नोकरीचे आमिष देऊन सागरचा मृत्यू आश्रमाने दडपला, असे सत्यशोधन अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पिंपळखुट्यात एक लहानसे हॉटेल चालविणाऱ्या सुभाष मेश्राम यांची मुलगी आश्रमातील शाळेत इयत्ता नववीत शिकायची. सुमारे दोन वर्षांपूर्वी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पांडुरंग ऊके हा शंकर महाराजांचा भाचा आहे. त्याची मुलगी आश्रमशाळेत इयत्ता सातवीत शिकत होती. दीड वर्षांपूर्वी विष प्राषन करून तिने आत्महत्या केली. आश्रमातील कृषीविज्ञान पदवी अभ्यासक्रमाला शिकणारी पूजा डेरे नावाची मुलगी आश्रम परिसरात ५० टक्के जळाली. नंतर ती मृत्युमुखी पडली. पिंपळखुटा येथील रहिवासी आणि पिंपळखुटा ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषविलेले श्रीधर गायके हे शंकर महाराज यांचे नि:स्सिम भक्त होेते. त्यांचे वास्तव्य आश्रमातच होते. ते दोन वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झाले. काही दिवसांनी त्यांचा मृतदेह बहिरम परिसरातील जंगलात कुजलेल्या अवस्थेत बेवारस आढळून आला.
प्रेत श्रीधर गायके यांचेच होते, हे त्यांच्या कपड्यांवरून आळखले गेले. अहवालात या पाच मृत्युंचा उल्लेख करण्यात आला आहे. शोधकार्य करून समितीने ही माहिती प्राप्त केली आहे. सर्वच मृत्यू आश्रमाशी संबंधित आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी यांनी दुर्लक्ष न केल्यास या संशयास्पद मृत्युचे गुढ उकलू शकेल.

Web Title: Five more deaths in ashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.