ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:14 IST2021-03-17T04:14:12+5:302021-03-17T04:14:12+5:30
अमरावती विद्यापीठाचा निर्णय, अधिसभेत सुभाष गावंडे यांचा प्रस्ताव एकमताने मंजूर अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील तीन माजी विद्यार्थ्यांना ...

ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच लाखांची मदत
अमरावती विद्यापीठाचा निर्णय, अधिसभेत सुभाष गावंडे यांचा प्रस्ताव एकमताने मंजूर
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील तीन माजी विद्यार्थ्यांना जपान येथे २०२२ मध्ये हाेऊ घातलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीच्या अनुषंगाने धनुर्विद्या साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी पाच लाखांची मदत करण्यात येणार आहे. अधिसभेत हा निर्णय सर्वानुमते मंजूर आला असून, सदस्य सुभाष गावंडे यांनी याबाबत प्रस्ताव सादर केला होता.
अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातील यशदीप भोंगे, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयातील सुखमणी बाबरेकर व श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयातील प्रवीण जाधव या तीन माजी विद्यार्थ्यांना धनुर्विद्या साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी पाच लाखांची मदत विद्यापीठ करणार आहे. टोक्यो (जपान) येथे २०२२ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने धनुर्विद्या शिबिराकरिता देशभरातून केवळ आठ खेळाडूंची निवड झाली आहे. यात तीन खेळाडू महाराष्ट्रातील असून, ते तिन्ही संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. या तीन विद्यार्थ्यांनी यापूर्वी आंतरविद्यापीठ स्पर्धेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. विशेषत: प्रवीण जाधव या विद्यार्थ्याला राज्य शासनाने क्रीडा साहित्य व इतर बाबींवर खर्च करण्यासाठी ५० लाखांचा निधी दिल्याची माहिती अधिसभा सदस्य सुभाष गावंङे यांनी सभागृहात दिली. हे तिन्ही खेळाडू सामान्य कुटुंबातील आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील धनुर्विद्या स्पर्धेत त्यांनी स्थान मिळविले, ही बाब विद्यापीठासाठी गौरवास्पद असल्याचा भावना सुभाष गावंडे यांनी व्यक्त केली.
अखेर गत आठवड्यात पार पडलेल्या अधिसभेत एकमताने तिन्ही माजी विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच लाखांची मदत करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. विद्यापीठाच्या या सकारात्मक निर्णयामुळे या खेळाडूंच्या पंखांना भरारी मिळेल, यात दुमत नाही.
--------------------
अधिसभा सदस्य सुभाष गावंडे यांनी सादर केलेला प्रस्ताव हा विद्यापीठाची प्रतिष्ठा उंचावणारा आहे. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आयोजित शिबिरात तिघे निवडले गेले आहेत. हे खेळाडू नक्कीच ऑलम्पिक स्पर्धेत अमरावतीचे नाव उंचावतील.
- मुरलीधर चांदेकर, कुलगरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.