चिमुकल्याच्या सुटकेसाठी मागणार होते पाच कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:20 IST2021-02-23T04:20:15+5:302021-02-23T04:20:15+5:30
शारदानगर अपहरण प्रकरण अमरावती : शारदानगरातून अपहरण केलेल्या चार वर्षीय चिमुकल्याला अहमदनगर येथील कोठला झोपडपट्टीतून कुख्यात गुंड टकलूच्या साथीदाराकडे ...

चिमुकल्याच्या सुटकेसाठी मागणार होते पाच कोटी
शारदानगर अपहरण प्रकरण
अमरावती : शारदानगरातून अपहरण केलेल्या चार वर्षीय चिमुकल्याला अहमदनगर येथील कोठला झोपडपट्टीतून कुख्यात गुंड टकलूच्या साथीदाराकडे सोपविले जाणार होते. यानंतर लुनिया कुटुंबाकडे या चिमुकल्याच्या सुटकेसाठी पाच कोटींची खंडणी मागितली जाणार होती. पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींकडून ही माहिती पोलिसांना मिळाल्याचे पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी स्पष्ट केले.
अपहरण प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेली चिमुकल्याची आजी मोनिका ऊर्फ प्रिया उर्फ मुन्नी जसवंतराय लुनिया (४७), व सपना ऊर्फ हिना शाकीर शेख उर्फ हिना अनिकेत देशपांडे (२५) यांची पोलीस कोठडदरम्यान चौकशी होत आहे. प्रकरणाची माहिती देताना पोलीस आयुक्त म्हणाल्या, इसार शेख उर्फ टकलू याच्या ताब्यात चिमुकला आल्यानंतर प्रकरणाची सूत्रे तो हलविणार होता. त्यासाठी आसिफ यूसुफ शेख व फिरोज रशीद शेख हे चिमुकल्याला घेऊन कल्याण मार्गाने निघाले होते. पुणे येथील साथीदार अज्जू अजीज याच्या माध्यमातून टकलूच्या ताब्यात चिमुकल्याला सोपवून मुलाच्या आजोबाकडून पाच कोटींची खंडणी उकळण्याचा त्यांचा बेत होता. पाच कोटींच्या रकमेतील सर्वांत मोठा वाटा मोनिका लुणीया हिच्याकडे जाईल, हे आधीच ठरले होते. चिमुकल्याचे आजोबा जसवंतराय मोठे फळ व्यापारी आहेत. त्यांच्याकडे कोट्यावधींची संपती असल्याची माहिती त्यांची दुसरी पत्नी मोनिकाला होती. तिनेच हिनाच्या मदतीने टकलूला या कटात सहभागी केले. मोहीम फत्ते करण्यासाठी त्याने आपली माणसे हिनाला पुरविली.
बॉक्स:
पोलीस दोघांच्या मागावर
अपहरण प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना तपास पथकाने अटक करून पोलीस कोठडीत डांबले आहे. अहमदनगर येथील इसार शेख ऊर्फ टकलू याच्या मागावर अहमदनगर व राजापेठ पोलिसांचे पथक आहे. यादरम्यान अज्जू अजीज हे नाव पुढे आल्याने पोलीस आता दोघांचाही शोध घेत आहेत.
बॉक्स:
अज्जू हिनाच्या संपर्कात
चिमुकला टकलूला सोपविण्यासाठी नेमलेला गुंड अज्जू अजीज हा हिनाचा नातेवाईक असल्याची बाब पोलीस तपासात स्पष्ट झाली आहे. ती त्याच्या संपर्कात होती. अज्जूला टकलूच्या मदतीने या कटात सहभागी करून घेतल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.
बॉक्स:
अपहरणापूर्वी मोनिकाला सहा वेळा कॉल
मुलाचे अपहरण करणार्या हिनाने बुधवारी सात ते आठ वाजताच्या सुमारास मोनिकाला सहा वेळा कॉल केल्याचे उघड झाले आहे. हिना ही त्याच वेळी इसार शेख ऊर्फ टकलूच्याही संपर्कात होती.
कोट
मुलाला टकलूचा साथीदार अज्जू अजीजच्या ताब्यात देऊन त्यानंतर पाच कोटींची खंडणी मागण्याचा प्लॅन आरोपींचा होता. ही बाब पीसीआरमध्ये पुढे आली. पोलीस दोन आरोपींच्या मागावर असून, लवकरच त्यांना अटक होईल.
पोलीस आयुक्त आरती सिंह