कोरोना उपायांसाठी अमरावती जिल्ह्यास पाच कोटींचा सीएसआर फंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:22 IST2021-05-05T04:22:13+5:302021-05-05T04:22:13+5:30

अमरावती : कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर बेड, उपचार साधनसामग्री, औषधी साठा यासोबत ऑक्सिजन उपलब्धतेसाठी शासन, प्रशासनाद्वारे आवश्यक ...

Five crore CSR fund to Amravati district for corona measures | कोरोना उपायांसाठी अमरावती जिल्ह्यास पाच कोटींचा सीएसआर फंड

कोरोना उपायांसाठी अमरावती जिल्ह्यास पाच कोटींचा सीएसआर फंड

अमरावती : कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर बेड, उपचार साधनसामग्री, औषधी साठा यासोबत ऑक्सिजन उपलब्धतेसाठी शासन, प्रशासनाद्वारे आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात ३० ऑक्सिजन बेड, तर उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेडसह आयसीयूची सुविधा उभारण्यात येणार असल्याचे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी सांगितले.

ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणांना बळकट करण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत याच्या मदतीने सीएसआर फंडातून जिल्ह्यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे, असे जिल्ह्यात चित्र नाही. मागणीनुसार रेमडेसिविर तत्काळ उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे ना. ठाकूर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मनपा आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्यासह आरोग्य यंत्रणेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यात आठ ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती केंद्र स्थापित करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात पाईपद्वारे ऑक्सिजन पुरवठा प्रणाली कार्यान्वित झाली आहे. याचप्रमाणे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आरोग्य केंद्रात ऑक्सिजन टँकची सुविधा उभारण्यात येणार असल्याने ग्रामीण भागात ऑक्सिजनची कमतरता भरून निघणार आहे. बेड, औषधी, ॲम्ब्युलन्ससंदर्भात कोणालाही काही तक्रार द्यावयाची असल्यास जिल्हा प्रशासनाशी किंवा तक्रार केंद्रावर संपर्क साधावा. नागरिकांच्या तक्रारीचा तात्काळ निपटारा करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

Web Title: Five crore CSR fund to Amravati district for corona measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.