महेंद्री जंगलातील बिबट हत्याप्रकरणी पाच आरोपी पसारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:38 IST2021-01-08T04:38:03+5:302021-01-08T04:38:03+5:30
अमरावती : वरूडनजीकच्या महेंद्री जंगलात शेकदरी गव्हाणकुंड वनबीटमध्ये २२ डिसेंबर रोजी एका पाच वर्षीय नर बिबट्याची हत्या करण्यात आली. ...

महेंद्री जंगलातील बिबट हत्याप्रकरणी पाच आरोपी पसारच
अमरावती : वरूडनजीकच्या महेंद्री जंगलात शेकदरी गव्हाणकुंड वनबीटमध्ये २२ डिसेंबर रोजी एका पाच वर्षीय नर बिबट्याची हत्या करण्यात आली. यात तीन आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. मात्र, या घटनेचा मुख्य सूत्रधारासह पाच आरोपी अद्यापही पसार आहेत. १५ दिवसांनंतरही बिबट्याचे मारेकरी पोलीस, वनविभागाच्या हाती लागले नाही, हे वास्तव आहे.
महाराष्ट्र- मध्यप्रदेशातील सीमावर्ती भागात अवैध दारू वाहतुकीसाठी घोड्यांचा वापर केला जातो. महेंद्री जंगलातूनच घोड्याच्या पाठीवरून अवैध दारू वाहून नेली जाते. घोड्यांच्या जिवाला बिबट्यामुळे धोका निर्माण झाल्याने दारू विक्रेत्यांनी बिबट्याचा ‘गेम’ केला असावा, असा प्राथमिक अंदाज तपासादरम्यान वनाधिकाऱ्यांना आला आहे. तपासाअंती तीन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. न्यायालयाने या तिघांचीही कारागृहात रवानगी केली. मात्र, बिबट्याचा मुख्य हत्यारा कोण? हे पोलीस किंवा तपास वनाधिकारी अदयापही शोधू शकले नाही. वरूडनजीकच्या भेमंडी आणि मध्यप्रदेशातील मुलताई तालुक्यातील कुणबीखेडा येथील बिबट हत्या प्रकरणातील आरोपी असल्याची माहिती पोलीस यंत्रणेला असताना ते का पकडले जात नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बिबट्याला निर्घृणपणे वार करून मारण्यात आले. शरीरावर कुर्हाडीचे घाव होते, असे पशु वैद्यकीय अधिकार्याच्या अहवालात नमूद असल्याची माहिती आहे. तरिही पाच पसार आरोपी अद्यापर्यंत जाळ्यात आले नाही.
---------------------------
बिबट हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मध्यप्रदेश, महाराष्ट्र पोलिसांचे सहकार्य घेण्यात येत आहे. आतापर्यंत तीन आरोपींना जाळ्यात अडकविले आहे. पाच आरोपी पसार झाले असून, त्यांचा शोध घेणे सुरूच आहे. लवकरच पसार आरोपी ताब्यात घेण्यात येईल.
- चंद्रशेखरन बाला, उपवनसंरक्षक, अमरावती