हिंगणघाट येथून पाच आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:10 IST2021-06-01T04:10:48+5:302021-06-01T04:10:48+5:30
बड़नेरा : बच्चू ऊर्फ रोहन वानखडे हत्याप्रकरणी गुन्हे शाखेने अमरावती शहरातील रहिवासी असलेल्या पाच आरोपींना हिंगणघाट येथून ताब्यात घेतले. ...

हिंगणघाट येथून पाच आरोपींना अटक
बड़नेरा : बच्चू ऊर्फ रोहन वानखडे हत्याप्रकरणी गुन्हे शाखेने अमरावती शहरातील रहिवासी असलेल्या पाच आरोपींना हिंगणघाट येथून ताब्यात घेतले. त्या सर्वांना न्यायालयाने ४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. राष्ट्रीय महामार्गालगत झुडुपात रविवारी बडनेरा पोलिसांना रोहनचा मृतदेह आढळून आला होता.
आकाश दिलीप मोरे (२६), करण कैलास ईटोरिया (२१), रोहित अमोल मांडळे (२०, तिघेही रा. राजापेठ) तसेच प्रशांत उर्फ सोनू चावरे (२१, बेलपुरा) व नितेश नारायण पिवाल (२६, रा. कल्याणनगर, अमरावती) असे आरोपींची नावे आहेत.
हत्याप्रकरणी रविवारी मृताचे काका महादेव हिरालाल वानखडे (रेल्वे लाईन झोपडपट्टी, अमरावती) यांनी बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्या आधारे भादंविचे कलम ३०२, २०१, ३६३, ३४, सहकलम ४, २५ आर्म्स ॲक्ट अन्वये गुन्हे दाखल केले. घटनेनंतर पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात पथक आरोपींच्या शोधात रवाना झाले. गुन्हे शाखेने पाच आरोपींना गोपनीय माहितीच्या आधारे हिंगणघाट येथून ताब्यात घेतले.
पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर, उपनिरीक्षक नरेशकुमार मुंढे, पोलीस हवालदार राजूआप्पा बाहेनकर, फिरोज खान, सतीश देशमुख, दिनेश नांदे यांच्या पथकाने आरोपीला अटक करण्यात यश मिळविले. पाचही आरोपींना ४ जूनपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास बडनेरा पोलीस करणार आहेत.
मृताच्या पोटापासून ते डोक्यापर्यंत धारदार शस्त्राने भोसकल्याच्या अनेक खुणा होत्या. चेहरा जळालेल्या अवस्थेत होता. अत्यंत क्रूरतेने बच्चूला मारण्यात आल्याचे घटनाक्रमावरून समोर आले. मृत व आरोपींचे वैर असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटना नेमकी कशामुळे घडली, आरोपींनी हत्या करताना कोणते शस्त्र वापरले तसेच आरोपींची संख्या वाढते का, यांसह इतरही बाबींचा तपासातून छडा लागणार आहे. घटनास्थळावरून कोणत्या वस्तू मिळाल्या, हे मात्र पोलिसांकडून समजू शकले नाही.