खुल्या कारागृहातील बंद्यांना मत्स्यपालनातून रोेजगार
By Admin | Updated: August 2, 2016 00:03 IST2016-08-02T00:03:17+5:302016-08-02T00:03:17+5:30
येथील मध्यवर्ती कारागृहात सुरू असलेल्या खुल्या कारागृहातील बंदीजनांनी मत्स्यपालन उपक्रम सुरु केला आहे.

खुल्या कारागृहातील बंद्यांना मत्स्यपालनातून रोेजगार
स्वयंरोजगाराचे धडे : अंगभूत गुणांवर आधारित रोजगाराचा प्रयत्न
अमरावती: येथील मध्यवर्ती कारागृहात सुरू असलेल्या खुल्या कारागृहातील बंदीजनांनी मत्स्यपालन उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमातून बंदीजनांना स्वंयरोजगार उपलब्ध झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.
कारागृहातील बंदीजनांची दिनचर्या सूर्योदय ते सूर्यास्त अशी असली तरी त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी तसेच त्यांचे पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्याचे गृहविभागाचे धोरण आहे. त्यानुसार येथील मध्यवर्ती कारागृहात पुरूष आणि महिला बंद्यांसाठी पाषाणाच्या चार भिंतींच्या आत नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून बंद्यांमध्ये सामाजिक जाण निर्माण केली जाते. तसेच महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करताना महामानवांनी देशासाठी केलेले कार्य देखील बंद्यांना सांगितले जाते. कारण न्यायालयाच्या आदेशानुसार विविध गुन्ह्यांखाली शिक्षा भोगणाऱ्या बंद्यांच्या मनात न्यूनगंड अथवा तिरस्काराची भावना निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करुन दिला जातो. बंद्यांमधील अंगभूत गुणांवर आधारित रोजगार देण्याचा प्रयत्न कारागृह प्रशासनाचा असतो. त्यानुसार बाजारपेठेतील मागणीनुसार रोजगार, स्वंयरोजगाराचे प्रशिक्षण देवून बंद्यांच्या हाताला रोजगार दिला जातो.
बंद्यांना दुहेरी उत्पन्नाचा लाभ
अमरावती : याच पार्श्वभूमिवर बंद्यांनी साकारलेल्या शेततळ्यात मत्स्यपालन व्यवसाय सुरु करण्यात आला आहे. या व्यवसायाचे प्रशिक्षण घेतलेल्या खुल्या कारागृहातील बंद्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. मत्स्यपालन व्यवसायाशी निगडित कामे हे देखील या खुल्या कारागृहातील बंद्यांवर सोपविण्यात आली आहेत. बाजारपेठेत ज्या जातीच्या माशांची मागणी आहे, त्या जातीचे मत्स्यपालन केले जात आहे. स्वंयरोजगारातून आर्थिक उत्पन्न आणि रोजगार असा दुहेरी लाभ साधण्यात आला आहे. यापूर्वी कारागृहात एलईडी लाईट, सूतकाम, शिवणकाम, सौदर्यप्रसाधने, सुतारकाम, फर्निचरनिर्मिती आदींच्या माध्यमातून कैद्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यात आले आहे.