स्मार्ट व्हिलेज निर्मितीचे तिवस्यात पहिले पाऊल
By Admin | Updated: August 27, 2014 23:13 IST2014-08-27T23:13:24+5:302014-08-27T23:13:24+5:30
तिवस्यात नवीन दवाखान्याची सुसज्ज इमारत, शासकीय ट्रॉमा केअर युनिट व तालुकास्तरीय क्रीडा संकुलाची उभारणी म्हणजे स्मार्ट व्हिलेज निर्मितीचे विदर्भात पडलेले हे पहिलेच पाऊल असल्याचे प्रतिपादन

स्मार्ट व्हिलेज निर्मितीचे तिवस्यात पहिले पाऊल
अमरावती : तिवस्यात नवीन दवाखान्याची सुसज्ज इमारत, शासकीय ट्रॉमा केअर युनिट व तालुकास्तरीय क्रीडा संकुलाची उभारणी म्हणजे स्मार्ट व्हिलेज निर्मितीचे विदर्भात पडलेले हे पहिलेच पाऊल असल्याचे प्रतिपादन आमदार यशोमती ठाकूर यांनी केले. सर्वांगीण विकास हा जनहित जोपासूनच करण्यात आलेला आहे व भविष्यात मतदारसंघातील मूलभूत समस्या आणि गरजा सोडविण्यासाठी माझी तत्परता कायम राहील, असेही यशोमती ठाकूर म्हणाल्यात.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोझरी विकास आराखडा अंतर्गत तिवसा व यावली येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच रस्त्यांचा लोकार्पण समारंभ थाटात पार पडला. तिवसा येथे दवाखान्याची सुसज्ज इमारत, तिवसा तालुक्यात अत्यंत गरजेचे शासकीय ट्रॉमा केअर युनिट व सुसज्ज क्रीडा संकुल असे १२.५० कोटींच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पार पडला. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, माजी आमदार भैयासाहेब ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, उपविभागीय अभियंता नागपूरकर, तहसीलदार लोखंडे, पं.स. सभापती देवीदास डेहणकर, आरोग्य अधिकारी शुभांगी नरवाडे यांची उपस्थिती होती.
क्रीडा संकुलामुळे खेळाडूंना खऱ्या अर्थाने व्यासपीठ तसेच अत्यावश्यक रुग्णसेवेला बळकटीकरण हा एक स्तुत्य उपक्रम आहे, असे उद्गार विभागीय आयुक्त यांनी यावेळी केले.