आधी कोरोनाबाधितांवर बेकायदा उपचार, आता मान्यतेसाठी पळापळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:11 IST2021-06-02T04:11:50+5:302021-06-02T04:11:50+5:30
पालिकेला दिला अर्ज : दवाखान्याचे फायर ऑडिट नाही लोकमत विशेष नरेंद्र जावरे परतवाडा : कोविड रुग्णांवर विनापरवानगी ...

आधी कोरोनाबाधितांवर बेकायदा उपचार, आता मान्यतेसाठी पळापळ !
पालिकेला दिला अर्ज : दवाखान्याचे फायर ऑडिट नाही
लोकमत विशेष
नरेंद्र जावरे
परतवाडा : कोविड रुग्णांवर विनापरवानगी व बेकायदा उपचार करणारे स्थानिक वैद्यकीय व्यावसायिक वैभव पाटील यांनी आता विविध परवानग्यांसाठी धावाधाव चालविली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्थानिक नागरी स्वराज्य संस्थेसह आरोग्य यंत्रणेची परवानगी अनिवार्य आहे. पाटील हे अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असताना, त्यांनी कुणाच्या परवानगीने दवाखाना थाटला आणि तोही कोविड सेंटर म्हणून, हा प्रश्न तूर्तास अनुत्तरित आहे. त्यांनी दवाखान्याचे फायर ऑडिटसुद्धा केले नसून, ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पालिकेत परवानगीचे पत्र दाखल केले.
परतवाडा येथील अचलपूर मार्गावरील एलआयसी चौकातील दवाखान्यात डॉ. वैभव पाटील यांच्यामुळे मोर्शी येथील शिक्षिका प्रतिभा टिपरे या महिलेचा चुकीच्या उपचाराने मृत्यू झाल्याची तक्रार पोलिसांसह आरोग्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. याच्या चौकशीला प्रारंभ होण्यापूर्वीच डॉ. वैभव पाटील यांनी धावपळ सुरू केल्याचे चित्र आहे. सहा महिन्यांपासून हे रुग्णालय ठाकरे बाल रुग्णालयाच्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये भाडेतत्त्वावर सुरू आहे. आवश्यक परवानगी न घेता हे रुग्णालय सुरू असताना प्रशासनाची डोळेझाक का, हा प्रश्नसुद्धा निर्माण झाला आहे.
बॉक्स
सहा महिन्यापासून दवाखाना? कुठलीच परवानगी नाही
कोणतेही खासगी रुग्णालय सुरू करण्यापूर्वी आवश्यक असलेली परवानगी पालिका व आरोग्य प्रशासनाकडून घेणे आवश्यक आहे. परंतु, डॉ. वैभव पाटील यांनी त्या परवानग्या घेतल्या नसल्याचे ‘लोकमत’च्या तपासणीत पुढे आले आहे. शासकीय रुग्णालयात कार्यरत असताना, खासगी दवाखाना चालवता येत नाही, असा शासनाचा नियम आहे. दुसरीकडे दवाखाना सुरू करण्यापूर्वी अगोदर नगरपालिकेची, तर आता शासनाच्या नवीन आदेशानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांची परवानगी हवी असते. ती परवानगी घेतलीच नसल्याचे यापूर्वीच ‘लोकमत’च्या तपासणीत उघड झाले होते, अशी माहिती दस्तुरखुद्द जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी दिली होती.
अग्निशमन विभागाचे फायर ऑडिट करणे गरजेचे असताना, ते केले गेले नाही. त्यामुळे रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरमुळे घातपात झाला, कुठल्या कारणाने आग लागली, तर त्याला जबाबदार कोण राहणार, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
बॉक्स
‘लोकमत’च्या वृत्तानंतर परवानगीचा अर्ज
प्रतिभा टिपरे यांच्यावर कोरोनाचा उपचार करीत असताना, त्यांना अन्य आजाराचा त्रास होत असतानादेखील डॉ. वैभव पाटील यांनी वेळीच निदान लावले नाही, अशी तक्रार पती राजेश टिपरे यांनी केली. त्यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये २६ आणि २८ मे रोजी वृत्त प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर २८ मे रोजी अचलपूर नगरपालिकेला केवळ परवानगीचा अर्ज डॉ. वैभव पाटील यांनी दाखल केला. त्यापूर्वी त्यांच्याकडे कुठलीच परवानगी नसल्याचे या घडामोडीतून स्पष्ट झाले आहे.
कोट
डॉ. वैभव पाटील यांनी परवानगीसंदर्भात अचलपूर नगरपालिकेला २८ मे रोजी अर्ज केला. तो अग्निशमन विभागाला प्राप्त झाला. त्यात नेमकी कशासंदर्भात परवानगी पाहिजे, याचा स्पष्ट उल्लेख नाही.
- संदेश जोगदंड, अग्निशमन अधिकारी, नगरपालिका, अचलपूर