कचरा जाळणाऱ्यांविरुद्ध पहिला ‘एफआयआर’
By Admin | Updated: January 10, 2017 00:05 IST2017-01-10T00:05:24+5:302017-01-10T00:05:24+5:30
महापालिकेच्या तक्रारीवरुन कचरा जाळणाऱ्याविरुध्द थेट फौजदारी तक्रार नोंदविण्यात आली आहे.

कचरा जाळणाऱ्यांविरुद्ध पहिला ‘एफआयआर’
अमरावती : महापालिकेच्या तक्रारीवरुन कचरा जाळणाऱ्याविरुध्द थेट फौजदारी तक्रार नोंदविण्यात आली आहे.कचरा जाळण्यासंदर्भात महापालिकेद्वारे नोंदविण्यात आलेली ही पहिली फौजदारी तक्रार ठरली आहे.याप्रकरणीची तक्रार गाडगेनगर पोलिसांनी नोंदवून घेतली आहे.खुल्या जागेवर कचरा जाळणे व प्रदुषण करणे हा फौजदारी गुन्हा आहे.
कचरा जाळण्या संदर्भात राष्ट्रीय हरित लवादाने स्थानिक स्वराज्य संस्थाना कारवाईचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार कचरा जाळणाऱ्याला ५००० रुपयांपर्यंतचा दंड ठोठावल्या जावू शकतो. यात फौजदारीची तरतूद सुध्दा आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ आणि हवा प्रदुषण १९८१ च्या कायद्यान्वये कचरा जाळण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे.त्या अनुषंगाने महापालिकेचे स्वास्थ निरिक्षक एस.एस. राजुरकर यांनी बियाणी चौकात कचरा ज़ाळल्या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांमध्ये तक्रार नोंदविली आहे.या पार्श्वभूमिवर नागरिकांनी कुठल्याच प्रकारचा कचरा जाळू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.महापालिकेच्या कुठल्याही साफसफाई कर्मचाऱ्याला किवा कंत्राटदाराला कचरा जाळता येत नाही. तसे आढळून आल्यास नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार करावी, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांनी केले आहे. कचरा जाळणे कायदेशिर गुन्हा आहे, हे अजूनही बहुतांश नागरिकांना माहित नाही. त्या पार्श्वभुमिवर महापालिकेने कचरा जाळणाऱ्याविरुध्द थेट पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविल्याने समाजातही जनजागृती होण्यास हातभार लागणार आहे.
३ जानेवारीला घडला प्रकार
अमरावती : तक्रारीनुसार, ३ जानेवारीला सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास एसबीआयच्या भिंतीजवळ कचऱ्याचा मोठा ढिग जळताना दिसून आला होता.त्यावेळी तेथे साफसफाई कामगार देवा समुद्रे हा काम करीत होता. तो कचरा अज्ञात इसमाने जाळला. तो कचरा विझविण्याकरिता समुद्रे गेले असता एका नागरिकाने ते छायाचित्र मोबाईलमध्ये टिपले व स्वच्छता अॅपवर प्रसारित केले. त्याआधारे कचरा जाळल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दाखल करुन घ्यावी, अशी तक्रार स्वास्थ निरीक्षकाने नोंदविली.वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्या सूचनेवरून ही तक्रार नोंदविली आहे. फौजदारी दाखल करून संबंधितांवर कारवाई व्हावी, असा महापालिकेचा हेतू असला तरी कचरा जाळणाऱ्या प्रवृत्तीवर जरब बसावी, ही त्यामागची सकारात्मक भावना आहे. कचरा जाळल्याने हवेत प्रदूषण निर्माण होते. पर्यावरणाचा ऱ्हास होतो. (प्रतिनिधी)
महापालिकेकडून तक्रार : कचरा न जाळण्याचे आवाहन
कंत्राटदाराकडून दंड वसूल
जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात स्वच्छ सर्वेक्षण होणार आहे. या पार्श्वभूमिवर स्वच्छतेसाठी कामगार लावण्यात आले असून देवा समुद्रे हा झोन क्रमांक १ च्या कंत्राटदाराचा कामगार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी सांगितले. एसबीआयजवळचा कचरा आपण जाळला नाही, असा माफीनामा समुद्रे याने दिला आहे. त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली. तथा संबंधित झोनच्या साफसफाई कंत्राटदाराकडून ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
कचरा जाळणाऱ्याविरुध्द फौजदारी तक्रार नोंदविण्याची तरतूद आहे. त्याअनुषंगाने पोलिसांमध्ये तक्रार नोंदविण्यात आली. प्रदूषणाला अटकाव घालण्यासाठी कुठल्याही नागरिकांनी कचरा जाळू नये.
- हेमंत पवार,
आयुक्त, महापालिका