परतवाड्याच्या मिल स्टॉपवर हवेत फायरिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 05:01 IST2020-08-06T05:00:00+5:302020-08-06T05:01:17+5:30
चौकात फटाक्यांचा आवाज येत असल्याने अनेकांचे कान टवकारले. परिसरातील मंगल कार्यालयात फिजिकल डिस्टन्स ठेवत लग्न असेल; त्यात फटाके फोडत असल्याचा भास झाला. परंतु, प्रत्यक्षात वेगळेच होते.दुचाकीवर आलेला इसम प्लास्टिकच्या खेळण्याच्या बंदुकीप्रमाणे असलेल्या यंत्रात कार्पेट आणि पाणी टाकून हलवित होता. गॅस लायटर लावले की, हवेच्या दिशेने खाड्कन आवाज निघत होता.

परतवाड्याच्या मिल स्टॉपवर हवेत फायरिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : मंगळवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास एक इसम दुचाकीने आला. त्याने बाजूला बांधलेली पिशवी उघडली. त्यातून बंदूक काढली. त्यात आवश्यक ती सामग्री टाकली आणि हवेत फायरिंग केली. झालेल्या आवाजाने परिसर दणाणून गेला. घरावर बसलेले ‘ते’ सैरावैरा पळत सुटले. या प्रकाराने सर्व नागरिकांचे लक्ष त्याने वेधून घेतले.
त्याचे झाले असे की, परतवाडा-अमरावती महामार्गावरील मिल स्टॉपला लागूनच असलेल्या देवमाळी परिसरात बहुतांशी नोकरदार वर्ग. त्यामुळे रस्त्यावर वर्दळ होती. अशात दुचाकीवर थेट बंदूक विकण्यासाठी आलेल्या त्या इसमाने केलेल्या फायरिंगच्या आवाजामुळे सर्वांचे लक्ष आकर्षित केले. कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी अनेकांनी त्याच्याकडून त्या बंदुका विकत घेतल्या आणि आत्मसंरक्षणासाठी सुरक्षिततेचा भाव चेहऱ्यावर आणत घरी परतले.
काय आहे नेमका प्रकार?
चौकात फटाक्यांचा आवाज येत असल्याने अनेकांचे कान टवकारले. परिसरातील मंगल कार्यालयात फिजिकल डिस्टन्स ठेवत लग्न असेल; त्यात फटाके फोडत असल्याचा भास झाला. परंतु, प्रत्यक्षात वेगळेच होते.दुचाकीवर आलेला इसम प्लास्टिकच्या खेळण्याच्या बंदुकीप्रमाणे असलेल्या यंत्रात कार्पेट आणि पाणी टाकून हलवित होता. गॅस लायटर लावले की, हवेच्या दिशेने खाड्कन आवाज निघत होता. या आवाजाने परिसरात हैदोस घालणारे माकड सैरावैरा पळत सुटले. भेटली एकदाची संरक्षणात्मक वस्तू म्हणून प्रत्येकाने ती खरेदी केली.