धामक येथे आगीत तीन घरे खाक
By Admin | Updated: May 1, 2016 00:05 IST2016-05-01T00:05:18+5:302016-05-01T00:05:18+5:30
शुक्रवारी रात्री २ वाजताच्या सुमारास धामक येथे आग लागून तीन घरे जळाली.

धामक येथे आगीत तीन घरे खाक
पालकमंत्र्यांची भेट : मध्यरात्री आगीच्या तांडवाने नागरिक भयभीत
नांदगाव खंडेश्वर : शुक्रवारी रात्री २ वाजताच्या सुमारास धामक येथे आग लागून तीन घरे जळाली. यात शे. इकबाल शे. गफूर यांच्या ११ बकऱ्या, १ गाय, १ वासरू, आॅईल इंजिन, सोयाबीनचे व तुरीचे कुटार व घरातील इतर साहित्याची राखरांगोळी झाली. तसेच शे. इरफान शे. गफूर यांच्या घरातील सोयाबीन, तूर, घरातील धान्य व भांडे कपडे, कोंबड्या व बकऱ्या व घरातील सर्व साहित्य आगीत भस्मसात झाले.
अ. सादीक शे. उमराव यांच्या घरातील एका खोलीतील साहित्य जळाले. तसेच शे. मुस्ताक शे. गफूर यांची बैलजोडी व गावातील दर्गा बांधण्याचे साहित्य जळाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
ही आग शुक्रवारी रात्री गावाच्या पूर्वेकडून लागली. आगीचे डोंब पाहता गावकरी मंडळी भयभीत झाली होती. या आगीचे तांडव पाहून महिला व लहान मुले भीतीने शेजारच्या शेतात आश्रयाला गेली होती. तातडीने गावातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला व गावकऱ्यांनी एकजुटीने धाव घेवून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायतीचा सार्वजनिक पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. कुपनलिका, हातपंप इत्यादी मिळेल त्या ठिकाणाहून पाणी आणून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न गावकऱ्यांनी केले.
या आगीची माहिती कळताच रात्री पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. वीरेंद्र जगताप, तहसीलदार बी. व्ही. वाहुरवाघ, मंगरुळ चवाळा व तळेगावची पोलीस मंडळी घटनास्थळी दाखल झाली. चांदूररेल्वे, धामणगाव, नेर परसोपंत येथील अग्नीशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या.
उघड्यावर आलेल्या या कुटुंबासाठी आ. वीरेंद्र जगताप यांनी घटनास्थळी तातडीने दहा हजार रुपये व गावकऱ्यांनी लोकवर्गणी गोळा करून १२ हजार ८१० रुपये ही रक्कम त्या दोन कुटुंबियांना तत्काळ मदत देण्यात आल्याचे महेंद्र काकडे या गावकऱ्याने सांगितले. (तालुका प्रतिनिधी)