मांजरखेड कसबा येथे जनावरांच्या गोठ्याला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:14 IST2021-03-10T04:14:08+5:302021-03-10T04:14:08+5:30

तीन म्हशी, तीन वासरे भाजली : विझवताना घरमालक अडकले आगीत चांदूर रेल्वे : तालुक्यातील मांजरखेड (कसबा) येथे जनावरांच्या ...

Fire at Manjarkhed Kasba cattle shed | मांजरखेड कसबा येथे जनावरांच्या गोठ्याला आग

मांजरखेड कसबा येथे जनावरांच्या गोठ्याला आग

तीन म्हशी, तीन वासरे भाजली : विझवताना घरमालक अडकले आगीत

चांदूर रेल्वे : तालुक्यातील मांजरखेड (कसबा) येथे जनावरांच्या गोठ्याला आग लागून तीन म्हशी व तीन वासरे गंभीररीत्या भाजली तसेच गोठ्यालगतचे घरही जळाले. आग विझवताना घरमालकसुद्धा भाजले. सोमवारी दुपारी २.३० वाजता ही घटना घडली. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

प्राप्त माहितीनुसार, मांजरखेड (कसबा ) येथील अजिमुद्दीन काझी (५०) यांच्या घरालगत असलेल्या गोठ्याला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. पाहता पाहता संपूर्ण गोठ्याने पेट घेतला. वृत्त समजताच गावकरी धावून आले तसेच चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या अग्निशमन बंबाने त्वरित घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविले.

आगीत गोठ्यातील तीन म्हशी व तीन वासरे जवळपास ३५ टक्के जळाली. या आगीने प्रमोद लाटेकर यांचे घर जळाले. त्यांच्या घरातील टीव्हीसह इतर वस्तू जळाल्या. या आगीत अजिमुद्दीन काझी हे आग विझवतांना १० टक्के भाजल्याची माहिती आहे. आगीचे वृत्त समजताच सरपंच दिलीप गुल्हाने यांनी त्वरित वीजपुरवठा बंद करायला लावला. सार्वजनिक नळ सोडून गावकऱ्यांच्या मदतीने पाण्याच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला, तर तलाठी मलमकर, पोलीस पाटील गुल्हाने यांनी घटनास्थळ गाठून झालेल्या नुकसानाचा त्वरीत पंचनामा केला. चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक गणेश मुपडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

----------------------

Web Title: Fire at Manjarkhed Kasba cattle shed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.