वनक्षेत्रात फायर लाईनची कामे कुचकामी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:11 IST2021-04-05T04:11:32+5:302021-04-05T04:11:32+5:30
फोटो पी ०४ परतवाडा फायर मेळघाटातील ‘दावानल वाढतेच, कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला ‘खो’ अनिल कडू परतवाडा : जंगलाला आगी लागू नयेत. ...

वनक्षेत्रात फायर लाईनची कामे कुचकामी!
फोटो पी ०४ परतवाडा फायर
मेळघाटातील ‘दावानल वाढतेच, कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला ‘खो’
अनिल कडू
परतवाडा : जंगलाला आगी लागू नयेत. लागलीच तर नुकसान होऊ नये म्हणून दरवर्षी मेळघाट वन व वन्यजीव विभागात फायर लाईनची कामे केली जातात. यावर कोट्यवधींचा खर्च केला जातो. यानंतर फायर वॉचर आणि अंगारीवर लाखो रुपये खर्ची पडल्याचे दाखविले जाते. पण, यावर्षी ही फायर लाईनची कामे कुचकामी ठरली आहेत. अंजनगाव वनपरिक्षेत्रात तर सर्वाधिक आगी लागल्या आहेत. फायर लाईनची कामे सुरू असतानाच अंजनगाव वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आगी लागल्या आहेत. पोपटखेडा-पांदरा खडकपासून तर पार दहिगाव-अंबापाटी गिरगुटीपर्यंत जंगल जळाले आहे.
मेळघाटच्या जंगलाला लागलेल्या आगीच्या घटनांची, प्रत्यक्ष जळालेल्या जंगल क्षेत्राची, झालेल्या नुकसानीची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशीची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. अंजनगाव वनपरिक्षेत्रात तर अधिकांश कर्मचारी मुख्यालयी राहतच नाहीत. ही बाब स्वत: मेळघाट प्रादेशिक वनविभागाच्या उपवनसंरक्षकांच्या दौऱ्यात उघड झाली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच मोहाफूल व तेंदुपत्ता हंगाम सुरू होत असतो. जंगलांना आग लागण्याच्या घटना घडतात. याबाबत वनविभागाला माहिती असल्याने डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत जाळरेषेच्या माध्यमातून वनक्षेत्राचे सभोवताल तसेच वनातून जाणाऱ्या रस्त्याच्या आजूबाजूचे गवत काढले जाते. तसेच अचानक लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निरक्षक (फायर वाचर)ची रोजंदारीने नियुक्ती केली जाते. पण वनाधिकारी व कर्मचाऱ्यांकडून प्रामाणिकपणे जाळरेषेचे काम केले जात नसल्यामुळे वनांना आग लागते, असे वन क्षेत्रालगत असणाऱ्या गावांतील नागरिकांचे म्हणणे आहे.
बॉक्स
आरएफओच नाही
अंजनगाव वनपरिक्षेत्रातील आरएफओचे पद मागील पाच महिन्यांपासून रिक्त आहे. तेथे नियमित आरएफओच नाहीत. मेळघाट प्रादेशिक वनविभागांतर्गत येत असलेल्या या अंजनगाव वनपरिक्षेत्राचा अतिरिक्त प्रभार अमरावती प्रादेशिक वनविभागातील परतवाडा येथील आरएफओंकडे देण्यात आला आहे. एका वनविभागातील एक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे दुसऱ्या वनविभागातील आरएफओकडे अतिरिक्त पदभार देण्याची, ही पहिलीच घटना ठरली आहे. सामाजिक वनविकरण विभाग अंजनगावच्या आरएफओंकडे परतवाडा येथील मेळघाट प्रादेशिक वनविभागातील लाकूड डेपोचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे.
----------------