आगीत चार घरे भस्मसात
By Admin | Updated: July 1, 2015 00:40 IST2015-07-01T00:40:53+5:302015-07-01T00:40:53+5:30
तालुक्यातील वणी (बेलखेड) येथे अचानक लागलेल्या आगीत चार घरे जळून भस्मसात झाली.

आगीत चार घरे भस्मसात
वणी येथील घटना : बियाण्यांसह नऊ हजारांची रोकड खाक
चांदूरबाजार : तालुक्यातील वणी (बेलखेड) येथे अचानक लागलेल्या आगीत चार घरे जळून भस्मसात झाली. यात घरातील साहित्य, बी-बियाण्यांसह नऊ हजारांच्या नोटाही जळून खाक झाल्या. ही आग सकाळी ११ वाजताच्या सुमारास लागली. आग लागल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य मंगेश देशमुख यांनी चांदूरबाजार अग्निशमन विभाग व पोलिसांना दिली. मात्र अग्निशमन वाहन घटनास्थळावर येण्यापूर्वीच गावकऱ्यांनी सामूहिकरीत्या या आगीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर अग्निशमन यंत्रणा घटनास्थळावर आली आणि त्यांनी आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. आगीत भस्मसात झालेल्या चार घरांपैकी दोन घरांत गॅस सिलिंडर होते. गावकऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ही दोन्ही सिलिंडर बाहेर काढण्यात यश मिळविले. अन्यथा या ठिकाणी मोठा स्फोट होण्याची शक्यता टळली. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येते. घटनेची माहिती मिळताच ब्राम्हणवाडा थडी पोलीस चौकीचे जमादार मडावी व तलाठी मानकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून नुकसानीचा अहवाल सादर केला.
या आगीत रंगराव धनसांडे यांच्या घरातील धान्य, कपडे, बियाणे व इतर साहित्यासह तीन हजाराच्या नोटा जळून खाक झाल्या. याच्या ४ जणाचे कुटूंब बेघर झाले आहे. शिवदास शेळके यांच्या घरातील धान्य व बियाणासह सर्व साहित्य जळून खाक झाले. गुंफा धनसांडे यांचेही ४ जणाचे कुटूंब उघड्यावर आले आहे. याच्या घरातील सहा हजाराच्या नोटा जळून खाक झाल्या आहेत.
संध्या शेळके यांच्या घरातील धान्य, कांदा, कपडे व बियाणासह ३ जणाचा संसार उघड्यावर आला आहे. आगीमध्ये जळालेल्ळा मालमत्तेचा पंचनामा सरपंच सूरज चव्हाण, पोलीस पाटील अमोल ठाकरे, सचिव देशमुख, ग्रा. पं. सदस्य मंगेश देशमुख यांचे उपस्थितीत तलाठी मानकर, जठार यांनी केला. (ता. प्रतिनिधी)