झटामझिरी येथे आगीत आठ घरे बेचिराख
By Admin | Updated: May 9, 2015 00:35 IST2015-05-09T00:35:09+5:302015-05-09T00:35:09+5:30
तालुक्यातील झटामझिरी येथे शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने आदिवासींची आठ घरे ....

झटामझिरी येथे आगीत आठ घरे बेचिराख
आदिवासी कुटुंब बेघर : शासनाकडून मदतीची अपेक्षा, दोन लाखांची हानी
वरुड : तालुक्यातील झटामझिरी येथे शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने आदिवासींची आठ घरे बेचिराख झाली. ग्रामस्थांनी सुरुवातीला आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निष्फळ ठरला. आगीची माहिती वरुड आणि शेंदूरजनाघाट येथील अग्निशमन दलाला देण्यात आली. परंतु पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत आग फोफावली होती. आगीतून ८० वर्षाच्या अंध वृध्दाला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. आगीमध्ये दोन लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले.
प्राप्त माहितीनुसार, झटामझिरी-तिवसाघाट मार्गावर आदिवासी कुटुंबाची वस्ती आहे. घटनेच्या वेळी सर्व मोठी माणसे कामावर गेली होती. मुले खेळत होती. एका घरात आंधळा वृध्द होता. अशावेळी आगीमुळे हलकल्लोळ झाला. गावातील युवकांनी आग विझविण्याकरिता पुरेपूर प्रयत्न केले. परंतु पाहता-पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. अग्निकांडात आठ घरे बेचिराख झालीत. यामध्ये हरिभाऊ जिवतू धुर्वे, रामबती उईके, रिमा शेषराव सिरसाम, विठ्ठल कोहलू तिडगाम, सुखदेव चयतू सरयाम, सुरेश मडांगे, पांडू साहेबलाल धुर्वे, रामचंद्र कमलसिंग धुर्वे यांच्या घराचा समावेश आहे. या आगीत अन्नधान्य, कपडे, तसेच टीव्ही संच, सायकली आणि मुलांची पुस्तके यांसह काही घरातील रोख रक्कम जळून खाक झाली. आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता वरुड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे सुरेश नरहरे, कृष्णा खोडस्कर, हरिभाऊ थेर तसेच शेंदूरजनाघाट नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या आगीनंतर आदिवासी कुटुंबांमध्ये विदारक परिस्थिती असून शासनाकडून अग्निग्रस्तांना मदत मिळावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. आदिवासी कुटुंब बेघर झाले आहेत.
अंध वृध्दाला जीवदान
घरातील मंडळी मजुरीच्या कामाला गेली असता घरात ८५ वर्षीय साहेबराव धुर्वे एकटेच होते. अचानक घरातून धूर निघू लागला. थोड्याच वेळात घराने पेट घेतला. पेटत्या घरात वृध्द तडफडत होता. गावातील युवकांनी वृध्दाला आगीतून बाहेर काढले. या धाडसासाठी युवकांचे कौतुक केले जात आहे.