धावत्या गॅस टँकरच्या केबिनला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 23:05 IST2019-02-09T23:05:09+5:302019-02-09T23:05:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क घुईखेड/तळेगाव दशासर : एचपीचा गॅस टँकर घेऊन जाणाऱ्या ट्रकने चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील एक्स्प्रेस हाय-वेवर ...

धावत्या गॅस टँकरच्या केबिनला आग
लोकमत न्यूज नेटवर्क
घुईखेड/तळेगाव दशासर : एचपीचा गॅस टँकर घेऊन जाणाऱ्या ट्रकने चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील एक्स्प्रेस हाय-वेवर अचानक शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही.
प्राप्त माहितीनुसार, नागपूरवरून मुंबईकडे एचपी गॅसचा टँकर घेऊन जाणाऱ्या भाटिया कंपनीच्या एमएच ३४ वाय ३३०८ या क्रमांकाच्या ट्रकने चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेडनजीक हायवेवर अचानक पेट घेतला. यामध्ये ट्रकचे केबिन पूर्णत: जळाले आहे. चालक रामविलास यादव (रा. गोरखपूर) हा सुखरूप बाहेर पडलाय. सदर आग शॉर्टसर्कीटने लागल्याचे समजते. घुईखेड ग्रामस्थांनी तीन टँकरच्या मदतीने जवळपास १ तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविले.
आग विझविण्यासाठी घुईखेडचे सरपंच विनय गोटफोडे, शेख रफीक, शेख समीर, श्रीकांत खोब्रागडे, लहानू मेश्राम, शरद लडके, नारायण पाखरे, गुड्डु सिंगारे, बंडू नाचणे, बालू मिचार्पुरे, राहुल बागडे आदींनी परिश्रम घेतले. घटनास्थळावर पोलीस प्रशासनसुद्धा तात्काळ पोहचले होते. गॅसचा टँकर रिकामा असल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
अग्निशमन ‘लेटलतीफ’
धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे येथील अग्निशमन दल घटनास्थळी उशिरा पोहचले. त्यापूर्वीच गावकºयांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. त्यामुळे दोन्ही अग्निशमन दलाच्या गाड्यांंना तेव्हाच परतावे लागले.
वाहनांच्या लांब रांगा
एक्स्प्रेस हायवे असल्याने वाहनांची वर्दळ सुरूच असते. सदर अपघात झाल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे जवळपास तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती.