महाविद्यालयांच्या ‘फायर ऑडिट’ची माहिती विद्यापीठात ‘ना’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:14 IST2021-03-16T04:14:21+5:302021-03-16T04:14:21+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित ३८२ महाविद्यालयांत फायर ऑडिटची माहिती नाही, असा धक्कदायक खुलासा गत आठवड्यात झालेल्या ...

महाविद्यालयांच्या ‘फायर ऑडिट’ची माहिती विद्यापीठात ‘ना’
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित ३८२ महाविद्यालयांत फायर ऑडिटची माहिती नाही, असा धक्कदायक खुलासा गत आठवड्यात झालेल्या अधिसभेत प्रशासनाने केला. त्यामुळे महाविद्यालयात अग्निशमन यंत्रांअभावी विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात तर नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
अधिसभा सदस्य मनीष गवई यांनी प्रश्न क्रमांक ९९ अन्वये अमरावती विद्यापीठाशी संलग्नित किती महाविद्यालयांत फायर ऑडिट झाले, महाविद्यालयात आग लागल्यास पर्यायी मार्ग, संकटकालीन बाहेर पडण्याचा मार्ग, नकाशे, आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक तसेच विद्यापीठ परिक्षेत्रात प्रयोगशाळा, अग्निसुरक्षा आदी विषयांवर प्रश्न विचारले होते. मात्र, विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांत फायर ऑडिट आहे अथवा नाही, याची माहिती ‘ना’ असे स्पष्ट करण्यात आले. महाविद्यालयात आगीसंदर्भात उपाययोजनांची माहिती संकलित करणारी यंत्रणा नाही. महाविद्यालयांच्या प्रयोगशाळांविषयीदेखील माहिती नसल्याचे उत्तरात नमूद आहे. परंतु, विद्यापीठ परिसरात शैक्षणिक विभाग, प्रयोगशाळांमध्ये फायर ऑडिट झाले असून, अग्निशमन यंत्रे असल्याची माहिती अधिसभेत देण्यात आलेली आहे.
----------------
विद्यार्थी हिताचे प्रश्न, समस्यांना प्राधान्य देणे हे अधिसभा सदस्य म्हणून कर्तव्य आहे. विद्यार्थ्याचे आरोग्य, सुरक्षितता आहे अथवा नाही, यासंदर्भात प्रश्न सादर केला होता. मात्र, महाविद्यालयांची ‘फायर ऑडिट’ माहिती देण्यात आली नाही.
-मनीष गवई, अधिसभा सदस्य, अमरावती विद्यापीठ