दिव्यांग मयूरची कला शाखेत भरारी
By Admin | Updated: May 26, 2016 01:19 IST2016-05-26T01:19:48+5:302016-05-26T01:19:48+5:30
स्थानिक केशरबाई लाहोटी महाविद्यालयाचा अंध विद्यार्थी मयूर गणेश गवळी याने कला शाखेत महाविद्यालयातून प्रथम क्रमांक प्राप्त केला.

दिव्यांग मयूरची कला शाखेत भरारी
८२.३८ टक्के : केशरबाई लाहोटी महाविद्यालय
अमरावती : स्थानिक केशरबाई लाहोटी महाविद्यालयाचा अंध विद्यार्थी मयूर गणेश गवळी याने कला शाखेत महाविद्यालयातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याने सामान्य विद्यार्थ्यांना मागे टाकून हे यश मिळविले, हे विशेष. त्याची निकालाची टक्केवारी ८२.३८ टक्के इतकी आहे.
तो नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील मूळ रहिवासी आहे. त्याचे इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण स्थानिक नरेंद्र भीवापूरकर अंध विद्यालयात झाले. येथूनच आपल्या आयुष्याला योग्य दिशा मिळाल्याचे तो नम्रपणे सांगतो. कुठल्याही विषयाची ट्युशन न लावता, त्याने हे यश संपादन केले आहे. नेत्रहीन असल्याने मोबाईलमध्ये सीडी डाऊनलोड करून वारंवार ते ऐकून त्याने अभ्यास केला. परीक्षेपूर्वी दोन महिने सातत्याने परिश्रम केल्याने हे यश मिळाले. शहरात राहणारे श्रीकांत तिरळकर हे त्याचे मावसभाऊ. तिरळकर कुटुंबांच्या सहकार्यानेच आपण हे यश संपादन केले, हे तो आवर्जून नमूद करतो. स्पर्धा परीक्षांच तयारी करून मोठे यश संपादन करण्याचा त्याचा मानस आहे. परंतु तत्पूर्वी योग्य अभ्यास करून शिक्षक होण्याचा व अर्थार्जन करण्याचे नियोजन त्याने केले आहे. इयत्ता दहावीतदेखील त्याने ८६ टक्के गुण मिळविले आहेत. कितीही संकटे आली तरी ध्येय विसरू नये, ध्येयप्राप्तीसाठी काहीही करण्याची तयारी हवी, असे तो म्हणतो. आपल्या यशाचे श्रेय त्याने शिक्षकांसह, पालकांना दिले आहेत.