बनावट स्वाक्षरीप्रकरणी ‘एफआयआर’
By Admin | Updated: January 24, 2017 00:15 IST2017-01-24T00:15:37+5:302017-01-24T00:15:37+5:30
प्रभागातील साफसफाईच्या देयकांवर आढळून आलेल्या स्वास्थ्य अधीक्षकांच्या बनावट स्वाक्षरीप्रकरणी ‘एफआयआर’ नोंदविला जाणार आहे.

बनावट स्वाक्षरीप्रकरणी ‘एफआयआर’
साफसफाई देयकांमधील अनियमितता : आयुक्तांनीही जाणून घेतले प्रकरण
अमरावती : प्रभागातील साफसफाईच्या देयकांवर आढळून आलेल्या स्वास्थ्य अधीक्षकांच्या बनावट स्वाक्षरीप्रकरणी ‘एफआयआर’ नोंदविला जाणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी या कारवाईला सोमवारी दुजोरा दिला.
बडनेरा शहरातील दोन प्रभागातील साफसफाईच्या देयकांवर स्वास्थ्य अधीक्षक अरूण तिजारे यांची बनावट स्वाक्षरी आढळून आली होती. तेच याप्रकरणी पोलीस ठाण्यात फौजदारी तक्रार नोंदवतील. तसे आदेश त्यांच्या नावे काढण्यात येणार आहेत. याकारवाईमुळे ‘ती’बनावट स्वाक्षरी कुणाची हे पोलीस तपासात निष्पन्न होईल. ‘बनावट स्वाक्षरीने १० लाखांचे बिल’ या शीर्षकाने साफसफाई देयकांमधील ही अनियमितता ‘लोकमत’ने रविवारी उघड केली. त्याअनुषंगाने सोमवारी आयुक्त हेमंत पवार यांनी अतिरिक्त आयुक्तांकडून माहिती घेतली तथा चौकशीच्या अनुषंगाने काही सूचना केल्यात. त्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी त्या देयकावरील बनावट स्वाक्षरी कुणाची, हे शोधण्यासाठी थेट फौजदारी तक्रार नोंदविण्याचा पवित्रा घेतला. यामुळे संबंधित घटकांचे धाबे दणाणले आहेत.
बडनेऱ्यातील दोन प्रभागातील प्रकार
अमरावती : याप्रकरणी पूर्वीच वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांसह सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी व स्वास्थ्य अधीक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मात्र बनावट स्वाक्षरी कुणाची, हे मात्र अनुत्तरित होते. एफआयआर नोंदविल्यानंतर ते उघड होईल. सुमारे १० लाख रुपयांची ही आर्थिक अनियमितता आहे.
महापालिकेतील ४३ प्रभागांची दैनंदिन साफसफाई करण्यासाठी प्रभागनिहाय कंत्राटदार नेमण्यात आलेत. कंत्राटदारांकडून पुरविण्यात येणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी आणि संबंधित बाबींची खातरजमा केल्यानंतर प्रभागाच्या स्वास्थ्य निरीक्षकांकडून देयकांबाबत अहवाल सादर केला जातो. विविध स्तरावर त्या देयकाची तपासणी केल्यानंतर देयके अदा केली जातात.
बडनेऱ्यातील प्रभाग क्रमांक ४१ बारीपुरा येथील बहिरमबाबा संस्था आणि प्रभाग क्रमांक ४२ सोमवार बाजार येथील मरिमाता बचत गट बडनेरा या संस्थेची माहे जुलै आणि आॅगस्ट या दोन महिन्यांचे चार देयके अतिरिक्त आयुक्तांकडे आलीत. या देयकावर स्वास्थ्य अधीक्षक अरुण तिजारे यांची बनावट स्वाक्षरी आढळून आली होती. दरम्यान आयुक्त हेमंत पवार यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून तीन दिवसांत चौकशी अहवाल मागविला आहे. याशिवाय मंगळवारी बनावट स्वाक्षरीबाबत एफआयआर दाखल केले जाणार आहे.
गोल्डमॅनने फाडले नोटशिटचे पान !
आरोग्य आणि स्वच्छता विभागाशी निगडित आणि साफसफाईची देयके काढून देणाऱ्या साखळीतील एक प्रमुख घटक ‘गोल्डमॅन’ने चक्क बनावट स्वाक्षरी असलेल्या नोटशिटचे पान फाडून नव्याने देयक बनविण्याची प्रक्रिया चालविल्याची कुजबूज महापालिकेत आहे. त्याला संबंधित अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला नसला तरी कंत्राटदाराची देयके थांबू नयेत म्हणून नव्याने देयक बनविण्याचे निर्देश दिल्याचे अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी सांगितले.
‘त्या’ कर्मचाऱ्याकडून ब्लॅकमेलिंग ?
महापालिकेत ‘गोल्डमॅन’ म्हणून परिचित एक कर्मचारी साफसफाई कंत्राटदारांना महिन्याकाठी विशिष्ट रकमेसाठी ‘ब्लॅकमेल’करीत असल्याची ओरड आहे. त्याचा तगादा वाढत गेल्याने त्याला टाळून एका संबंधित घटकानेच या ‘गोल्डमॅन’ची बनावट स्वाक्षरी केल्याची चर्चा महापालिकेत आहे तर दुसरीकडे आपल्याला टाळून साफसफाईची देयके अतिरिक्त आयुक्तांकडे जातातच कशी, हा मुद्दा प्रतिष्ठेचा करून बनावट स्वाक्षरीचा घोळ घालण्यात आल्याची शक्यता आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी वर्तविली आहे.