पोहऱ्याच्या १० हेक्टर जंगलाला वणव्याचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2017 00:23 IST2017-03-10T00:23:29+5:302017-03-10T00:23:29+5:30
अमरावती ते चांदूररेल्वे मार्गावरील पोहरा जंगलात टॉवरनजीक सुमारे १० हेक्टर परिसराला गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास अचानक आग लागली.

पोहऱ्याच्या १० हेक्टर जंगलाला वणव्याचा विळखा
वन्यजीव बचावले : खोडसाळपणे आग लावल्याचा संशय, तीव्र हवेमुळे भडकली
अमरावती : अमरावती ते चांदूररेल्वे मार्गावरील पोहरा जंगलात टॉवरनजीक सुमारे १० हेक्टर परिसराला गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. तीव्र हवेमुळे आगीने वेग घेतला होता. ही आग कोणीतरी खोडसाळपणाने लावल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. तब्बल दीड तासांच्या महत्प्रयासाने आग आटोक्यात आली. मात्र या आगीत कोणतेही वन्यजीवांना हानी पोहोचली नाही, हे विशेष.
उन्हाळा सुरू झाला की, जंगलात वणव्याच्या घटना घडतात. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वनविभागाने सॅटेलाईटचा वापर सुरू केला आहे. गत काही दिवसांपूर्वी वडाळी जंगलात आगीची किरकोळ घटना घडली होती. मात्र चांदूररेल्वे मार्ग सतत वर्दळीचा असल्याने पोहरा जंगलात टॉवरनजीक रस्त्यावर कुणीतरी सिगारेट, विडी ओढल्यानंतर धुटुक फेकल्याने आग लागली असावी. अथवा कुणीतरी खोडसाळपणे जंगलास आग लावली असावी, असा अंदाज वनविभागाचा आहे.
ज्यावेळी ही आग लागली तेव्हा जंगलात तीव्र वारे वाहत होते. त्यामुळे आग वेगाने पसरली. आगीवर नियंत्रणासाठी वनविभाग, अग्निशमन, पोलीस विभागाची चमू घटनास्थळी पोहोचली. सर्व यंत्रणांनी आपआपल्या परिने आग रोखली. परंतु तीव्र हवेमुळे सुमारे १० हेक्टर परिसराला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही अग्निशमन बंबाद्वारे विझविण्यात आली. वनखंड क्रमांक ७८ अंतर्गत उत्तर चोरआंबा बीटमध्ये ही आग लागली होती. वनपाल विनोद कोहळे यांच्या मार्गदर्शनात आगीचा पंचनामा करण्यात आला आहे. आग लागल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध वनगुन्हा जारी करून वनविभागाने तपास चालविला आहे. आग विझविण्यासाठी वनकर्मचाऱ्यांनी ब्लोअर मशीनचा वापर केला होता. यात वनपाल विनोद कोहळे, वनरक्षक नितीन नेतनवार, पी.जी. शेंडे, शेख अनिस, नीलेश करवाडे, दिलीप काळबांडे, किशोर धोटे, छत्रपती वानखडे, दीपक नेवारे, बाबाराव पळस्कर आदींनी आग नियंत्रणात आणणयासाठी मोलाची भूमिका बजावली. (प्रतिनिधी)
सॅटेलाईटवर झळकली आग
पोहरा जंगलात गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास आग लागल्याची माहिती सॅटेलाईटवर झळकली होती. त्यानंतर त्वरेने वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी सूत्रे हलविली. पोहरा वनविभागाची चमू काही वेळेतच घटनास्थळी पोहोचली. मात्र वेगवान हवेमुळे ही आग आटोक्यात आणण्यासाठी दीड तास पाण्याचा मारा करावा लागला. आता जंगलात आग लागल्यास नव्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सॅटेलाईटद्वारे वनाधिकाऱ्यांना कोणत्या भागात आग लागली हे दिसून येते.