पालकमंत्र्यांकडून पायलच्या लग्नासाठी आर्थिक बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:09 IST2021-06-17T04:09:55+5:302021-06-17T04:09:55+5:30
दत्तक लेकीच्या लग्नासाठी ना. यशोमती ठाकूर यांचा पुढाकार; सामाजिक जाणीवेचा दिला परिचय अमरावती, दि. १६ : राज्याच्या महिला आणि ...

पालकमंत्र्यांकडून पायलच्या लग्नासाठी आर्थिक बळ
दत्तक लेकीच्या लग्नासाठी ना. यशोमती ठाकूर यांचा पुढाकार; सामाजिक जाणीवेचा दिला परिचय
अमरावती, दि. १६ : राज्याच्या महिला आणि बालविकासमंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी काही वर्षांपूर्वी दत्तक घेतलेल्या पायल रडके या मुलीचा आता विवाह होत आहे. आपल्या दत्तक लेकीच्या लग्नासाठी ना. ठाकूर यांनी पुढाकार घेतला असून, आर्थिक मदतही केली आहे.
पायलला आपल्या पायावर उभे राहता यावे, यासाठी तिची जबाबदारी महिला व बालविकास मंत्री यांनी घेतली व तिला आयुष्याची वाटचाल करण्यास बळ दिले. आपली लेक पायल आता नवीन आयुष्याची सुरुवात करत असताना तिला आशीर्वाद देत ना. यशोमती ठाकूर यांनी तिला आर्थिक मदतही केली.
पायल ही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. रामा गावात राहणाऱ्या पायलच्या आई आणि वडिलांनी काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यानंतर अनाथ झालेली पायल आपल्या मामाकडे राहत आहे. पायलचा सर्व खर्च करण्याची जबाबदारी ना. ठाकुरांनी घेतली होती. पायलच्या नवीन आयुष्यात तिला सर्व सुख लाभो, अशी प्रार्थनासुद्धा ना. ठाकूर यांनी केली.
कोरोना संकटात अनेक बालकांचे आई-वडील किंवा एका पालकाचे निधन झाल्याने ते अनाथ झाले आहेत. अशा मुलांच्या संगोपनाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. सरकारने या मुलांसाठी मदतीची योजनाही जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ठाकूर यांनी काही दिवसांआधीच अनाथ झालेल्या मुलीची जबाबदारी घेत सामाजिक जबाबदारीचा आदर्श घालून दिला आहे.
०००