बांधकाम विभागात कोट्यवधीची आर्थिक अनियमितता

By Admin | Updated: September 16, 2016 01:05 IST2016-09-16T01:05:14+5:302016-09-16T01:05:14+5:30

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या रस्ते, आरोग्यकेंद्र,

Financial irregularities of billions in construction area | बांधकाम विभागात कोट्यवधीची आर्थिक अनियमितता

बांधकाम विभागात कोट्यवधीची आर्थिक अनियमितता

अमरावती : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या रस्ते, आरोग्यकेंद्र, वाहनतळ ,भक्तनिवास, प्रशासकीय इमारतींसह अन्य बांधकामांमध्ये कोटयवधी रूपयांची आर्थिक अनियमितता झाल्याचा ठपका पंचायतराज समितीने ठेवला आहे. सन २०१२-१३ या आर्थिक वर्षामध्ये झालेल्या बांधकामाचा आढावा घेतल्यानंतर विविध आघाड्यांवरील अनियमिततेवर समितीने बोट ठेवले आहे. स्थानिक निधीलेखा परीक्षा संचालनालयाने प्रसिध्द केलेल्या अहवालातून हा सावळा गोंधळ उघड झाला. भातकुली तालुक्यातील घाटखेडा येथे ठक्करबाप्पा आदिवासी विकास योजनेंतर्गत ५ लाख रूपयांचा काँक्रीट रस्ता बांधण्यात आला. मात्र, निधीग्राह्यता संपल्यानंतर त्या कामाचे आदेश देण्यात आलेत. याकामाबाबत शासकीय प्रयोगशाळेचा चाचणी अहवाल सादर करण्यात आला नाही. याशिवाय देयकातून दोन टक्के आयकर आणि दोन टक्के विक्रीकर सुध्दा वसूल करण्यात आला नाही. या कामात वापरलेल्या सिमेंटच्या दर्जाबद्दल पीआरसीने आक्षेप नोंदविला आहे.
तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे २०१२-१३ मध्ये प्राथमिक आरोग्यकेंद्र बांधण्यात आले. या कामावर २५.५० लाख रूपये खर्च करण्यात आला. याकामातही सिमेंटच्या दर्जाबाबत ठपका ठेवण्यात आला आहे. लेखासंहितेचा नियमभंग करून निविदा मंजूर करण्यात आली. यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यानी दिलेल्या तांत्रिक नियमानुसार मंजुरी घेण्यात आली नाही. विशेष म्हणजे या बांधकामाची मूळ नस्ती पीआरसीसमोर सादर करण्यात आली नाही. याशिवाय निविदा पुस्तिकेचे प्रत्येक पान कार्यकारी अभियंत्याच्या स्वाक्षरीनिशी प्रमाणित केले नाही. कमी अधिक प्रमाणात जि.प.च्या बांधकाम विभागामार्फत झालेल्या सिमेंटच्या दर्जाबाबत आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.

येथे झाली अनियमितता
नानोरी येथील उपकेंद्राचे बांधकाम, धानोरा येथील वाहनतळ, माधान भक्तनिवास बांधकाम, चिंचोली ते वरूडा रस्ता सुधारणा,चिखलदरा पंचायत समिती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, शेळघाट येथील सिमेंट काँक्रीट रस्ता, धारणीतील तारूबांधा येथील सिमेंट काँक्रीट रस्ता, आळी ते पिंपाझरी डांबरीकरण, बलूृमगव्हाण, पळसखेड येथील पशुवैद्यकीय दवाखाना, रामा ते बोराळा रस्त्याची दुरूस्ती, धारणी तालुक्यातील खारी पोच मार्ग, तिवसा तालुक्यातील बिच्चूखेडा पोचमार्ग आदी ठिकाणच्या कामावर पंचायतराज समितीने ठपका ठेवला आहे.

Web Title: Financial irregularities of billions in construction area