- अखेर मंडळ अधिकारी निलंबित

By Admin | Updated: September 4, 2015 00:25 IST2015-09-04T00:25:44+5:302015-09-04T00:25:44+5:30

जुळ्या नगरीत घडलेल्या बहुचर्चित अमित बटाऊवाले हत्येप्रकरणी रेती तस्करांना पाठीशी घातल्याप्रकरणी दोषी आढळल्याने अखेर प्रभारी मंडळ अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले.

- Finally suspended by the Circle Officer | - अखेर मंडळ अधिकारी निलंबित

- अखेर मंडळ अधिकारी निलंबित

अमरावती /अचलपूर : जुळ्या नगरीत घडलेल्या बहुचर्चित अमित बटाऊवाले हत्येप्रकरणी रेती तस्करांना पाठीशी घातल्याप्रकरणी दोषी आढळल्याने अखेर प्रभारी मंडळ अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले. गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबनाचे आदेश दिले. रेती तस्करांचे अप्रत्यक्षपणे मनोबल उंचावणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यावर कारवाई करण्यास विलंब का? अशा आशयाची रोखठोक भूमिका याप्रकरणी ‘लोकमत’ ने सातत्याने मांडली होती. परिणामी घटनेनंतर तब्बल २० दिवसांनी महसूल प्रशासनाला जाग आली. अनिल पोटे असे निलंबित मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे.
तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात ‘बारूद गँग’ने रेती तस्करीच्या वादातून अमित बटाऊवाले या निर्दोष युवकाची हत्या केली होती. यानंतर जनतेमध्ये आक्रोश निर्माण झाला होता. महसूल अधिकाऱ्यांच्या आणि पोलिसांच्या बोटचेप्या धोरणामुळेच अमितचा बळी गेल्याचे त्याच्या कुटुंबियांचे आणि तालुक्यातील त्रस्त जनतेचे म्हणणे होते. याप्रकरणी लहान माशांवर कारवाई झाली पण मोठ्या माशांवर कारवाई केव्हा? अशी भूमिका घेऊन ‘लोकमत’ने या हत्याकांडाचा पाठपुरावा निर्भिडपणे केल्यानेच मंडळ अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकला, अशी चर्चा तालुक्यात होती.
अचलपूर येथे ११ आॅगस्ट रोजी रेती तस्करांनी भरदिवसा-वर्दळीच्या रस्त्यात अमित बटाऊवाले नामक तरूणाची हत्या केली होती तर त्याचे वडील मोहन कन्हय्यालाल बटाऊवाले यांना गंभीर जखमी केले होते. या घटनेनंतर रेती तस्कर व त्यांना अभय देणारे संबंधित महसूल अधिकारी व पोलिसांबद्दल जनतेत तीव्र रोष निर्माण झाला होता.
तहसीलदारांवर कारवाई का नाही ?
पाणी मुरते कुठे?

गेल्या काही दिवसांपूर्वी महिलेसोबत वाद झाल्यानंतर व त्याबाबतचे वृत्त वृत्तपत्रात प्रकाशित झाल्यानंतर चांदूरबाजार येथील एका नायब तहसीलदाराला विभागीय आयुक्त राजुरकर यांनी तडकाफडकी निलंबित केले होते. याप्रकरणाची तक्रारही पोलीस ठाण्यात नव्हती. असे असूनही नायब तहसीलदाराचे निलंबन झाले. मात्र, अचलपूर येथे रेती तस्करांनी अमितची हत्या केल्यानंतर व सातत्याने त्याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतरही तहसीलदारांवर कारवाई होत नसल्याने नेमके पाणी मुरते कोठे , असा सवाल जनता करीत आहे.

Web Title: - Finally suspended by the Circle Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.