अखेर इंदिरा नगरातील विजेचा खांब खासगी जागेतून हटवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:12 IST2021-03-07T04:12:24+5:302021-03-07T04:12:24+5:30

रस्ता झाला प्रकाशमय : पालिकेचा निर्णय, नागरिकांना उभारता येणार दुसरा माळा मोर्शी : येथील इंदिरानगरातील विजेचा खांब अखेर खासगी ...

Finally, the power pole in Indira Nagar was removed from the private space | अखेर इंदिरा नगरातील विजेचा खांब खासगी जागेतून हटवला

अखेर इंदिरा नगरातील विजेचा खांब खासगी जागेतून हटवला

रस्ता झाला प्रकाशमय : पालिकेचा निर्णय, नागरिकांना उभारता येणार दुसरा माळा

मोर्शी : येथील इंदिरानगरातील विजेचा खांब अखेर खासगी जागेतून हटविण्यात आला आहे. नगरपालिकेच्या या जनहितार्थ निर्णयामुळे ५० वर्षांपासून रेंगाळलेला अवघड प्रश्न निकाली निघाला आहे. या निर्णयामुळे इंदिरानगरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांना त्यांच्या घराची उंची वाढविण्याचा मार्गही प्रशस्त झाला आहे. त्याचवेळी खासगी जागेतील विजेच्या खांबांचे अतिक्रमण दूर झाले असून त्या भागातील मुख्य रस्ताही प्रकाशमान झाला.

इंदिरानगर भागात टेलिफोन एक्सचेंजला लागून रहिवासी क्षेत्र आहे. या क्षेत्रात एकाच ओळीने आठ-दहा कुटुंबे राहतात. या कुटुंबांतील प्रत्येक सदस्याने प्लॉट विकत घेऊन त्या ठिकाणी घरे बांधली. परंतु या घरांची उंची वाढविताना अर्थात दुसऱ्या माळ्याचे बांधकाम करताना सार्वजनिक वीज वाहिनीचे तार यमदूत म्हणून उभे ठाकले होते. त्यामुळे ५० वर्षांत येथे कोणालाही आपल्या घरावर दुसरा माळा उभारता आला नाही. ही अडचण लक्षात आल्यानंतर तेथीलच एक रहिवासी राजेंद्र लाखोडे यांनी नगरपालिकेकडे तक्रार नोंदविली. तक्रारीनंतर पालिका प्रशासनाने त्याची शहानिशा केली. त्या वेळी असे लक्षात आले की त्या भागातील प्लॉटची विक्री होण्यापूर्वीच सार्वजनिक दिवाबत्तीची सोय म्हणून विजेचे खांब उभे करण्यात आले. यातील काही खांब अक्षरश: काही नागरिकांच्या खासगी जागेत होते. परंतु ते हटवायचे तर पालिकेने आम्हाला नुकसानभरपाई द्यावी, असे तत्कालीन म. रा. विद्युत मंडळाचे (आताचे महावितरण) म्हणणे होते. त्यामुळे बराच काळ हा मुद्दा दोन कार्यालयांमधील आरोप-प्रत्यारोपात अडकून पडला.

दरम्यानच्या काळात विद्यमान नगरसेवक वैशाली कोकाटे व त्यांचे यजमान भूषण कोकाटे यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा न. प. प्रशासनाच्या पटलावर आणला. नगरपालिका ही नागरिकांना सुविधा पुरविणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. त्यामुळे पालिकेने आवश्यक तो खर्च महावितरणला देऊन तेथील नागरिकांना दिलासा दिला पाहिजे, अशी मांडणी वैशाली कोकाटे यांनी न. प. सभांमध्ये केली. तत्कालीन उपाध्यक्ष आप्पा गेडाम यांनीही या बाबीस दुजोरा देत कोकाटे यांचा मुद्दा उचलून धरला. त्यामुळे पालिकेने महावितरणकडे आवश्यक ती रक्कम भरण्याची तयारी दर्शविली.

महावितरणने उभारली नवी वाहिनी

पालिकेच्या या जनहितार्थ निर्णयानंतर महावितरणने विजेचे पर्यायी खांब रस्त्याच्या कडेला उभे करून त्यावर नव्याने वीज वाहिनी उभारली. या घटनेमुळे इंदिरानगरातील नागरिक कमालीचे आनंदित झाले आहेत. राजेंद्र लाखोडे व तेथील काही रहिवाशांनी दहापेक्षा अधिक वर्षांच्या कालखंडापासून सुरू केलेल्या लढ्याला यश मिळाले आहे.

Web Title: Finally, the power pole in Indira Nagar was removed from the private space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.