अखेर जिल्हाधिकाऱ्यांचा प्रधान सचिवाला अहवाल
By Admin | Updated: November 25, 2015 00:55 IST2015-11-25T00:55:05+5:302015-11-25T00:55:05+5:30
जिल्ह्यात १९८५ गावांपैकी १९६७ गावांची पैसेवारी ५० पैशाच्या आत आहे.

अखेर जिल्हाधिकाऱ्यांचा प्रधान सचिवाला अहवाल
बच्चू कडूंच्या आंदोलनाचे फलित : दुष्काळग्रस्त घोषित करण्याची शिफारस
अमरावती : जिल्ह्यात १९८५ गावांपैकी १९६७ गावांची पैसेवारी ५० पैशाच्या आत आहे. दुष्काळग्रस्त गावांना राज्य शासनाच्या उपाययोजना लागू करण्याच्या दृष्टीने ही सर्व गावे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात यावी, असा अहवाल जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी महसूल विभागाचे प्रधान सचिवांना २० नोव्हेंबर रोजी सादर केला आहे.
शासनाचे ३ नोव्हेंबर २०१५ आदेशानुसार जिल्ह्याची खरीप हंगाम सन २०१५-१६ ची सुधारित पैसेवारी ४६ पैसे जाहीर करण्यात आलेली आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये १९८५ गावे समाविष्ट असून त्यापैकी लागवड योग्य १९९७६ गावांमध्ये मान्सून कालावधीत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ पर्जन्यमानात खंडला. त्यामुळे पीक परिस्थितीवर विपरित परिणाम झाल्याने सुधारित पैसेवारी ४६ पैसे इतकी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील एकूण १९६७ गावे ३ नोव्हेंबरच्या शासन निर्णयातील सूचनेप्रमाणे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करणे योग्य होईल, असे जिल्हाधिकारी गित्ते यांनी अहवालात नमुद केले आहे. जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी केल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित होण्याची औपचारिकता राहली आहे. (प्रतिनिधी)