अखेर उपमहापौर शेख जफर जेरबंद
By Admin | Updated: September 24, 2015 00:28 IST2015-09-24T00:28:26+5:302015-09-24T00:28:26+5:30
तडीपार असतानाही शहरात आढळून आलेला आरोपी उपमहापौर शेख जफर शेख जब्बार याला बुधवारी शहर कोतवाली पोलिसांनी नमुना परिसरातून अटक केली.

अखेर उपमहापौर शेख जफर जेरबंद
तडीपार प्रकरण : मनाईहुकूम झुगारून शहरातच
अमरावती : तडीपार असतानाही शहरात आढळून आलेला आरोपी उपमहापौर शेख जफर शेख जब्बार याला बुधवारी शहर कोतवाली पोलिसांनी नमुना परिसरातून अटक केली. शेख जफरला खंडणी प्रकरणात न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला आहे.
उपमहापौर शेख जफर दोन वर्षांसाठी शहरातून तडीपार करून त्याला अकोला शहर देण्यात आले होते. दरम्यान शेख जफरने नमुना येथील निवासस्थानी हेमंत व्यास व त्यांचा मुलगा प्रशांत व्यास यांना पाच तास डांबून ५ कोटी २८ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणात शहर कोतवाली पोलिसांनी शेख जफरसह सात जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
सीपीने घेतली परेड
जफरला अटक करून गाडगेनगर ठाण्यात नेल्यावर पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी त्यांची चांगलीच परेड घेतली. तेथे पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे सुध्दा पोहचले. त्यांनी शेख जफरची कसून चौकशी केली. यावेळी शेख जफरच्या समर्थकांची ठाण्याबाहेर मोठी गर्दी जमली होती.
आतापर्यंत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून शेख जफरच्या शोध सुरू होता. मात्र, त्याने अटकपूर्व जामीन मिळविला आहे. मात्र बुधवारी जफर विना परवानगीने अमरावतीत दाखल झाला होता. सायंकाळी ५.४० वाजताच्या सुमारास शहर कोतवालीचे ठाणेदार दिलीप पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी अमोल खंडेझोड, अक्षय देशमुख व विजय पेठे दुचाकीने नमुना परिसरात गस्त घालत होते. दरम्यान त्यांनी शेख जफरला घरून ताब्यात घेतले आहे. प्राप्त माहितीनुसार शेख जफर बकरी ईदनिमित्त घरी परत आला होता. अटक केल्यानंतर शेख जफरने पोलिसांना अटक न करण्याची विनवणी केली. मात्र, ठाणेदार दिलीप पाटील यांनी जफरला दुचाकीवर बसवून ठाण्यात आणले. या घटनेची माहिती पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांना दिली. तेंव्हा पोलीस आयुक्तांनी ठाणेदार पाटील यांना जफरला गाडगेनगर ठाण्यात आणण्याचे निर्देश दिले. त्यानंतर गाडगेनगर पोलीस ठाण्यात शेख जफरची पोलीस आयुक्तांनी पुढील चौकशी चालविली होती.