अखेर वादग्रस्त शिक्षिकेच्या सेवा समाप्तीचा निर्णय
By Admin | Updated: September 25, 2015 01:08 IST2015-09-25T01:08:03+5:302015-09-25T01:08:03+5:30
नजीकच्या भूगाव येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या वादग्रस्त ठरलेल्या शिक्षिकेच्या सेवा समाप्तीचा निर्णय शाळा समितीने गुरूवारी झालेल्या बैठकीत घेतला ...

अखेर वादग्रस्त शिक्षिकेच्या सेवा समाप्तीचा निर्णय
शिक्षण समितीची बैठक : भूगावची आदर्श शाळा दुसऱ्या दिवशीही बंद
अचलपूर : नजीकच्या भूगाव येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या वादग्रस्त ठरलेल्या शिक्षिकेच्या सेवा समाप्तीचा निर्णय शाळा समितीने गुरूवारी झालेल्या बैठकीत घेतला तर शाळा दुसऱ्या दिवशीसुद्धा बंद होती. या निर्णयानंतर आता शाळा सुरळीत होण्याची शक्यता आहे.
भूगाव येथील आदर्श शिक्षण संस्थेद्वारे संचालित आदर्श प्राथमिक विद्यालयातील शिक्षण सेविका प्रतिभा गुणवंत ठाकरे यांना शिकविता येत नसल्याचा गंभीर आरोप खुद्द विद्यार्थ्यांनी केला होता. गत दीड वर्षापूर्वी त्या शाळेत रुजू झाल्या होत्या तर मागील एक वर्षापासून संबंधित शिक्षिकेस गणिताची तासिका असताना चुकीचे उत्तर सांगण्यासोबत उद्धट वागणूक देत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. तसे त्यांनी आपल्या पालकांना सांगितले होते. सदर बाब मुख्याध्यापक आर. के. गादे व संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांना सांगितली होती. त्यानुसार संबंधित शिक्षिकेला पत्राद्वारे तसे सांगण्यात आले होते परंतु त्यांच्या शिकविण्याच्या पद्धतीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झाला नाही तर दुसरीकडे विद्यार्थ्याच्या तक्रारी वाढल्या. याविरुद्ध पालकांनी संबंधित सदर शिक्षिकेला शिकविण्यास बंदी करणे सोबत शाळेत न ठेवण्याची मागणी केली. त्यावर सुद्धा कुठलाच निर्णय होत नसल्याचे पाहुन बुधवारी संतप्त पालकांनी शाळाच बंद केली व शिक्षिकेच्या हकालपट्टीची मागणी केली होती. या आंदोलनाची दखल घेण्यात आली असून शिक्षिकेवर कारवाई करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)
शिक्षिकेचा राजीनामा नाही
संबंधित शिक्षिका प्रतिभा ठाकरे यांनी गुरूवारी स्वत:हून राजीनामा देणार असल्याचे संबंधिताकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार सकाळी ११ वाजता ठेवण्यात आलेल्या बैठकीत त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा करण्यात आली. परंतु राजीनामा न आल्याने शाळा शिक्षण समितीतर्फे सेवा समाप्तीचा निर्णय घेण्यात आला. शिक्षण सेविका असल्याने तीन वर्षापूर्वी तसा निर्णय घेण्याचा अधिकार समितीला असल्याचे संबंधिताकडून सांगण्यात आले.
एक सदस्य तटस्थ
प्रतिभा ठाकरे या शिक्षण सेविकेच्या सेवा समाप्तीचा निर्णय घेण्यासाठी शाळा समितीची बैठक बोलाविण्यात आली. त्यामध्ये अध्यक्ष प्रदीप पाटील, सचिव गोपाळराव अढाऊ, मुख्याध्यापक राजेंद्र गादे, सदस्य वैभव काळे, रामू मोरे यांनी सेवा समाप्तीवर शिक्कामोर्तब केले तर सुरेश ठाकरे हे तटस्थ राहिले. अन्य सदस्य सुनील ठाकरे हे अनुपस्थित होते.
शाळा उघडणार
दोन दिवसांपासून कुलूप लागलेल्या शाळेचे दरवाजे आता उघडणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संबंधिताकडून दखल घेण्यात आली आहे तर दोन दिवसाचा अभ्यासक्रम अतिरिक्त शिकवणी वर्ग घेवून पूर्ण केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. पालकांसह विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
शाळा समितीच्या बैठकीत सदर शिक्षण सेविकेच्या सेवासमाप्तीचा निर्णय घेण्यात आला. तसे पत्राद्वारे त्यांना कळविले जाणार आहे. तर शाळेचे कामकाज आता सुरळीतपणे सुरू करण्यावर आमचा भर आहे. पालकांनी सहकार्य करावे.
- प्रदीप पाटील
अध्यक्ष, आदर्श शिक्षण संस्था, भूगाव.