अखेर कंत्राटदारांनीच सुधारले मोर्शीतील नादुरूस्त रस्ते

By Admin | Updated: June 4, 2015 00:09 IST2015-06-04T00:09:21+5:302015-06-04T00:09:21+5:30

येथील पालिकेच्या मुख्याधिकारी गीता ठाकरे यांच्या आदेशामुळे कंत्राटदारांना निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचे बांधकाम पुन्हा...

Finally, the contractor improved the unreleased roads in Morshi | अखेर कंत्राटदारांनीच सुधारले मोर्शीतील नादुरूस्त रस्ते

अखेर कंत्राटदारांनीच सुधारले मोर्शीतील नादुरूस्त रस्ते

मुख्याधिकाऱ्यांचे पालिकेला आदेश : निकृष्ट साहित्याचा वापर करणे भोवले
मोर्शी : येथील पालिकेच्या मुख्याधिकारी गीता ठाकरे यांच्या आदेशामुळे कंत्राटदारांना निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचे बांधकाम पुन्हा करणे भाग पडले. एकीकडे मुख्याधिकारी गीता ठाकरे लोकाभिमुख कामांना गती देत असतानाच दुसरीकडे दुखावलेल्या पदाधिकाऱ्यांचा एक गट त्यांच्या विरोधात कार्य करीत असल्याचे चित्र आहे.
नगर परिषद अभियंता डिसेंबरमध्ये २४ दिवसांच्या प्रदीर्घ रजेवर असताना त्यांच्या अनुपस्थितीत चार डांबरी रस्ते तयार करण्यात आले. विरोधी गटातील नऊ नगरसेवकांनी नवनिर्मित रस्त्याच्या दर्जाबद्दल आक्षेप घेऊन उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविली होती. उपविभागीय अधिकाऱ्यांनी याप्रकरणी नपकडून अहवाल मागविला होता. २८ दिवसानंतर नपने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविला. त्यात सदर काम निकृष्ट दर्जाचे झाले असून रस्त्यावर खड्डे पडल्याचे आणि कंत्राटदाराकडून रस्त्याचे काम पुन्हा करून घेण्याचे विशद केले होते. यावरून संबधित कंत्राटदाराला काम पुन्हा करण्याचे आदेश पालिकेने दिले होते.
त्यास अनुसरुन दोन कंत्राटदारांनी रस्त्याचे बांधकाम पुन्हा करुन दिले. तथापि एका कंत्राटदाराने नपच्या आदेशाला केराची टोपली दाखविली होती. मुख्याधिकारी गीता ठाकरे रुजू झाल्यावर त्यांच्या नजरेस ही बाब आल्यावर त्यांनी संबंधित कंत्राटदाराला तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे तातडीने रस्त्याची निर्मिती पुन्हा करुन देण्याचे आणि असे न केल्यास त्याला काळया यादीत टाकण्यात येणार असल्याचे कळविले. शेवटी संबंधीत कंत्राटदाराला रस्त्याचे पून्हा अस्तरीकरण करुन देणे भाग पडले. मुख्याधिकारी गीता ठाकरे यांच्या या आक्रमक व चोख कार्यशैलीमुळे शहरातील एक वर्ग सुखावला असून दुखावलेल्या दुसऱ्या गटात मात्र त्यांच्याविरूध्द असंतोष खदखदत असल्याचे दिसते. (तालुका प्रतिनिधी)

त्रयस्थ यंत्रणा
बोलाविण्यामागचे रहस्य काय ?
नपच्या बांधकामाविषयी तक्रार प्राप्त झाल्यावर विशिष्ट रकमेवरील कामाचे त्रयस्थ यंत्रणेकडून मूल्यांकन करवून घेण्याची पध्दत आहे. याकरिता या त्रयस्थ यंत्रणेच्या शुल्काचा भरणा नप ला करावा लागतो. वादग्रस्त रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्याचा अहवाल खुद्द नपने उपविभागीय अधिकाऱ्यांना पाठविल्यानंतर मात्र याच रस्त्याच्या दर्र्जा विषयी मूल्यांकन करून घेण्याकरिता त्रयस्थ यंत्रणेला बोलाविण्यात आले होते. नप स्वतच: काम निकृष्ट असल्याचे सांगत असताना त्रयस्थ यंत्रणेला बोलाविण्याचे औचित्य काय? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शुल्क भरून त्रयस्थ यंत्रणेला पाचारण करण्यामागे पालिकेचा कोणता उद्देश आहे, हे कळण्यास मार्ग नाही.

पदाधिकाऱ्यांची नाराजी !
एकीकडे कार्यालयीन कामकाजात शिस्त निर्माण व्हावी, नागरिकांच्या पैशाचा दुरुपयोग होऊ नये, दर्जेदार काम व्हावे, भ्रष्टाचारमुक्त आणि लोकाभिमुख, शहर विकासाचे कामकाज व्हावे या भूमिकेतून मुख्याधिकारी गीता ठाकरे यांची धडपड सुरु असतानाच दुसरीकडे हितसंंबंध दुखावले गेलेले कंत्राटदार, पदाधिकारी, नळाला मोटारपंप लावण्याप्रकरणी पकडली गेलेली मंडळी, मुख्याधिकारी गीता ठाकरे यांच्या विरोधात वातावरण निर्माण करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात असंतुष्टांचा गट सक्रिय झाल्याचे चित्र असून यातून अधिक रंजक घटना घडू शकतात.

Web Title: Finally, the contractor improved the unreleased roads in Morshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.