बोंद्रेंची चौकशी अंतिम टप्प्यात
By Admin | Updated: July 26, 2016 00:30 IST2016-07-26T00:30:19+5:302016-07-26T00:30:19+5:30
महापालिकेतील सहाय्यक पशूशल्यचिकित्सकांची चौकशी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

बोंद्रेंची चौकशी अंतिम टप्प्यात
उपायुक्तांकडे जबाबदारी : नियमबाह्य नियुक्तीचे प्रकरण
अमरावती : महापालिकेतील सहाय्यक पशूशल्यचिकित्सकांची चौकशी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. चपराशीपुरा येथील महम्मद शाहेद रफिक यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने नगरविकास विभागाने बोंद्रेबाबतचा अहवाल पाठविण्याच्या सूचना आयुक्तांना केल्या होत्या. बोंद्रे यांच्या तथाकथित नियमबाह्य नियुक्तीची चौकशीला मनपास्तरावर वेग आला आहे.
सहाय्यक पशूशल्य चिकित्सक पदावर करण्यात आलेली बोंद्रेंची नियुक्ती रद्द करावी, अशी सप्रमाण तक्रार महम्मद शाहेद रफिक यांनी १८ मे रोजी नगरविकास विभाग मंत्रालयात केली. त्या तक्रारीची दखल घेत नगरविकास विभागाने २० जूनला महापालिका आयुक्तांना याबाबत पत्र दिले. महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी शशीकांत योगे यांच्या स्वाक्षरीचे हे पत्र आहे. सहाय्यक पशूशल्य चिकित्सक (कंत्राटी) पदासाठी आवेदन करताना खोटी माहिती दिल्याबद्दल म. शाहेद यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने अर्जदाराला आपल्या स्तरावर उत्तर देण्यात यावे व त्याची प्रत नगरविकास विभागास सादर करण्याच्या त्या सूचना होत्या. त्यावर आयुक्त हेमंत पवार यांनी या प्रकरणाची चौकशी करून अभिप्रायासह १५ दिवसात अहवाल सादर करा, असे निर्देश उपायुक्त (साप्रवि) यांना दिलेत.
आयुक्तांच्या सुचनांच्या अनुषंगाने उपायुक्तांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केलीे. हा अहवाल अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. लवकरच तो आयुक्तांमार्फत नगरविकास विभागाकडे पाठविला जाईल. दरम्यान सचिन बोंद्रे यांची नियुक्ती करतेवेळी तत्कालिन अधिकाऱ्यांनी बोंद्रे यांनी पुरविलेल्या अनुभव प्रमाणपत्रासह अन्य दस्ताएैवजांची सत्यता पडताळून पाहिली नसल्याचा प्राथमिक ठपका ठेवण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.
महानगरपालिका हद्दीतील कत्तलखाना बंद असताना सचिन बोंद्रे यांनाच नियुक्ती का? असा प्रश्नही तत्कालिन वेळी उपस्थित करण्यात आला होता. मात्र राजकीय दबावापोटी बोंद्रे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे निरीक्षण चौकशी अधिकाऱ्यांनी नोंदविली असल्याचे समजते. (प्रतिनिधी)
नियुक्तीची फाईल बोंद्रे यांच्याकडे
सुत्रानुसार, तत्कालिन मुख्यमंत्र्यांकडे आमदाराने केलेल्या शिफारशीने बोंद्रे यांच्यासाठी पदनिर्मिती करण्यात आली. बोंद्रे महापालिकेत सेवा देऊ लागले. मात्र त्यांच्या नियुक्तीचे कुठलाही दस्ताएैवज सामान्य प्रशासन विभागाकडे उपलब्ध नसल्याची माहिती आहे. त्यांच्या नियुक्तीची फाईलही त्यांनी स्वत:कडेच ठेवल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
नगरविकास विभागाच्या पत्रानुसार सचिन बोंद्रे यांच्या नियुक्तीबाबतची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. लवकरच अहवाल सादर करू.
- विनायक औगड,
उपायुक्त, प्रशासन