दोन्ही व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: June 19, 2016 23:57 IST2016-06-19T23:57:30+5:302016-06-19T23:57:30+5:30
अचलपूर बाजार समितीच्या मार्केट यार्डमधील दुकान क्रमांक ९ मध्ये अडत्याने अवैधरीत्या साखर साठवणूक केल्याप्रकरणी ...

दोन्ही व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल
साखर प्रकरण : व्यापाऱ्यांमध्ये खळबळ, बाजार समितीत बैठक सुरू
नरेंद्र जावरे परतवाडा
अचलपूर बाजार समितीच्या मार्केट यार्डमधील दुकान क्रमांक ९ मध्ये अडत्याने अवैधरीत्या साखर साठवणूक केल्याप्रकरणी कांडली येथील विकेत्यासह दोघांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत शनिवारी रात्री अचलपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. रविवारी बाजार समिती सभागृहात काही व्यापाऱ्यांनी बैठक घेतली. 'लोकमत'ने सतत लावून धरलेल्या या प्रकरणाला प्रशासनाने गांभीर्याने घेत चौकशी आरंभली होती. सुभाषचंद्र अग्रवाल व संजय अग्रवाल (दोन्ही रा.परतवाडा) अशी आरोपींची नावे आहेत.
साखर आली कोठून ?
परतवाडा : तहसीलदार मनोज लोणारकर यांच्यावतीने पुरवठा अधिकारी प्रमोद नागपुरे यांनी अचलपूर पोलीस ठाण्यात शनिवारी फिर्याद दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी जीवनाश्यक वस्तू कायद्यांतर्गत ३,७ अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. १५ जून रोजी हा प्रकार उघड झाला होता. ही साखर कोठून आणली, यासाठी साखरेचा साठा सील करुन संबंधित व्यापाऱ्याला लेखी नोटीस बजावून कागदपत्रे सादर करण्याचा अवधी तहसीलदारांनी दिला होता. दरम्यान व्यापारी सुभाषचंद्र अग्रवाल याने श्रीहरी इंडस्ट्रीजची पावती सादर केली होती तर दुसरीकडे श्रीहरी इंडस्ट्रीजचा मालक संजय अग्रवाल याला साखर खरेदी कागदपत्रे सादर करण्याचा अवधी दिला होता. मात्र, त्याने चार दिवसात कोणतीच कागदपत्रे सादर केली नाहीत. परिणामी त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला. व्यापारी सुभाषचंद्र अग्रवाल यांच्या दुकानात जप्त करण्यात आलेल्या साखरेच्या या साठयाची नोंदच नाही. परिणामी बाजार समितीचे कर्मचारी सुद्धा यात सहभागी असल्याचे चर्चा आहे.
शनिवारी रात्री दोन्ही व्यापाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल होताच रविवारी दुपारी २ वाजता तातडीची बैठक घेण्यात आली. काही व्यापाऱ्यांनी पाठ फिरविली तर काही व्यापाऱ्यांनी हजेरी लावली.
तारखेत तफावत , परवाना नाही
बाजार समितीचा व्यापारी, अडत्या सुभाष अग्रवाल याने चौकशीअंती तहसीलदारांना सादर केलेल्या पावत्यामधील तारखांमध्ये तफावत आढळून आली असून जीवनाश्यक वस्तू कायद्यानुसार साखर साठवणूक करण्याचा कुठलाच परवाना त्याच्याजवळ नसल्याचे तहसीलदार मनोज लोणारकर यांनी केलेल्या चौकशीत उघडकीस आले. त्यानंतर हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला होता. याप्रकरणात फौजदारी कारवाई करण्याची परवानगी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिल्यावर पुरवठा निरीक्षकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
दोन्ही व्यापाऱ्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस बजावून अवधी देण्यात आला होता. मात्र, एकाच्या पावतीमध्ये तफावत तर दुसऱ्याने काहीच सादर न केल्याने पोलिसांत फिर्याद देण्यात आली.
- मनोज लोणारकर,
तहसीलदार, अचलपूर
तहसीलदारांतर्फे पुरवठा निरीक्षकांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरुन दोन्ही व्यापाऱ्यांवर जीवनाश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
- नरेंद्र ठाकरे,
ठाणेदार, अचलपूर ठाणे