२२०० बॅलेट युनिट दाखल
By Admin | Updated: October 7, 2014 23:26 IST2014-10-07T23:26:26+5:302014-10-07T23:26:26+5:30
जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांपैकी ६ मतदारसंघांत निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या ही १८ ते २० च्या दरम्यान असल्याने या मतदारसंघांत अतिरिक्त बॅलेट युनिटची गरज भासणार आहे.

२२०० बॅलेट युनिट दाखल
अमरावती : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांपैकी ६ मतदारसंघांत निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या ही १८ ते २० च्या दरम्यान असल्याने या मतदारसंघांत अतिरिक्त बॅलेट युनिटची गरज भासणार आहे. त्यामुळे अहमदनगर येथून २ हजार २०० बॅलेट मशिन बोलविण्यात आल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी या मशिन अमरावतीत पोहचल्या आहेत.
गत विधानसभा निवडणुकीचा अंदाज घेऊन निवडणूक विभागाने ३ हजार ६९० बॅलेट व ३ हजार २५० कंट्रोल युनिट छत्तीसगढ राज्यातून बोलविल्या होत्या. मेळघाट व बडनेरा मतदारसंघ वगळता अन्य सहा विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची संख्या ही १८ ते २० असल्याने या सहा मतदारसंघात एक अतिरिक्त बॅलेट युनिटचा वापर करावा लागणार आहे. एका बॅलेट युनिटवर १५ उमेदवार आणि नोटा असा एकूण १६ ची मर्यादा आहे. बडनेरामध्ये १५ उमेदवार रिंगणात आहेत तर मेळघाट मतदारसंघात ६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असल्याने या दोन मतदारसंघांत एकच मतदान यंत्र प्रत्येक मतदान केंद्रावर उपयोगात आणले जाणार आहे. याशिवाय अचलपूर, दर्यापूर, तिवसा, मोर्शी, धामणगाव, अमरावती या मतदारसंघात १५ पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असल्याने या मतदारसंघात दोन बॅलेट युनिटचा उपयोग करावा लागेल. त्यामुळे प्रशासनाने अतिरिक्त २२०० बॅलेटव कंट्रोल युनिटचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविला होता. हा प्रस्ताव आयोगाने मंजूर करून अमरावती जिल्ह्यासाठी २२०० बॅलेट युनिट अहमदनगर येथून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे मतदान यंत्र मंगळवारी संध्याकाळपर्यंत शहरात पोहोचल्याची माहिती निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी रवींद्र धुरजड यांनी दिली. (प्रतिनिधी)