‘दिल्ली दरबार’चे फाईल आयुक्तांच्या बंगल्यावर
By Admin | Updated: September 28, 2015 00:25 IST2015-09-28T00:25:05+5:302015-09-28T00:25:05+5:30
तत्कालीन महसूल मंत्र्यांच्या आशीर्वादाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा परिषदेच्या जागेवर साकारण्यात आलेल्या ...

‘दिल्ली दरबार’चे फाईल आयुक्तांच्या बंगल्यावर
नियमबाह्य बांधकाम : ‘रंगोली पर्ल’नंतर कारवाईची प्रतीक्षा
अमरावती : तत्कालीन महसूल मंत्र्यांच्या आशीर्वादाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा परिषदेच्या जागेवर साकारण्यात आलेल्या दिल्ली दरबार या हॉटेलच्या अवैध बांधकामाबाबतची फाईल महापालिका आयुक्त यांच्या बंगल्यावर असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
दोन दिवसांपूर्वी बडनेरा मार्गावर रंगोली पर्ल या अलिशान हॉटेलचे नियमबाह्य बांधकाम पाडल्यानंतर महापालिका प्रशासनाची नजर आता ‘दिल्ली दरबार’कडे लागली आहे. दोन दिवसांपूर्वी दिल्ली दरबार हॉटेलचा शुभारंभ करण्यात आला आहे. मात्र या हॉटेलच्या संचालकांनी पार्किंग अंतर्गत बांधकाम हे नियमबाह्य केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. मंजूर बांधकामाचे नकाशे, शासनाने दिलेली परवानगी, जागेची वस्तुस्थिती तपासणीचे काम आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सहायक संचालक नगररचना विभागाच्या माध्यमातून केले आहे. दिल्ली दरबार हॉटेल निर्माण करताना पार्किंगची व्यवस्था करण्यात आले नाही, हे प्रथमदर्शनी दिसून येते. वरच्या माळ्यावर विनापरवानगीने हॉल निर्माण करण्यात आला आहे.
नकाश मंजूर करताना तळमजल्यात पार्किग दर्शविण्यात आले होते. मात्र बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पार्किंगची जागा वापर केली जात आहे. एकूण हजार ते १२०० चौ.स्के.फूट बांधकाम नियमबाह्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. २४ सप्टेंबर रोजी रंगोली पर्ल व दिल्ली दरबार या दोन्ही हॉटेलचे अवैध बांधकाम पाडण्याबाबत आयुक्तांनी निर्णय घेतला होता. मात्र रंगोली पर्लचे बांधकाम पाडले. तर दिल्ली दरबार अजूनही थंडबस्त्यात आहे.