रुग्णाच्या मृत्यूनंतर इर्विनमधील वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 06:00 IST2019-12-11T06:00:00+5:302019-12-11T06:00:28+5:30
मृताच्या नातेवाइकांनी डॉक्टरला मारहाण केल्याने वॉर्डात गोंधळ उडाला होता. आरडाओरड व मारहाण पाहून अन्य रुग्ण भयभित झाले होते. काही नागरिक बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, मृताच्या नातेवाईकांनी वॉर्डातील कुणालाही बाहेर जाऊ दिले नाही. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

रुग्णाच्या मृत्यूनंतर इर्विनमधील वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अपघातात जखमी रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण करून रोष व्यक्त केला. औषधोपचारात हयगयीचा आरोप करीत नातेवाइकांनी मंगळवारी सकाळी ८.३० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रचंड गोंधळ घातला. डॉक्टरांवर कारवाई होईपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा घेतल्याने तणावसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ गाठून स्थिती हाताळली.
मार्डी येथील आतिष ईश्वर लोणारे (२२) हा अपघातात गंभीर जखमी झाला. त्याला ८ डिसेंबर रोजी दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. ओपीडीतील उपचारानंतर आतिषला वॉर्ड १५ मध्ये दाखल करण्यात आले. डोक्याला मार असल्यामुळे आतिषचे सीटी स्कॅन करण्यात आले, एक्सरे काढण्यात आले. मनोचिकित्सक, ऑर्थोपीडिक व ईएमओ यांनीही आतिषच्या प्रकृतीची तपासणी केली. मंगळवारी सकाळी ७ वाजता आतिषचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणा व औषधोपचारात हयगय केल्यामुळेच आतिषचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी रोष व्यक्त केला. त्याचवेळी वैद्यकीय अधिकारी अस्थिरोगतज्ज्ञ शशिकांत फसाटे हे वॉर्ड १५ मध्ये राऊंडवर आले. त्यावेळी रुग्णांसोबत असलेल्या चार जणांनी त्यांना मारहाण सुरू केली. हा गोंधळ पाहून परिचारिकांनी सुरक्षा गार्डना बोलाविण्यासाठी मोबाइलवर कॉल केला असता, फोनसुद्धा फेकून दिला. या घटनेच्या माहितीवरून सुरक्षा रक्षक व इर्विन चौकीतील पोलिसांनी वॉर्ड १५ मध्ये धाव घेतली. गोंधळ घालणाऱ्या नागरिकांना बाहेर काढले. यानंतर वॉर्ड बॉयच्या मदतीने मृतदेह उचलून शवविच्छेदनगृहात नेला.
डॉक्टर पोहोचले कोतवाली ठाण्यात
मंगळवारी सकाळी हा प्रकार घडल्यानंतर काही डॉक्टरांनी पोलिसांत तक्रार करण्याचे ठरविले. त्या अनुषंगाने डॉ. फसाटेंसह सात ते आठ डॉक्टरांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांनी भेट घेतली. रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुरक्षेविषयी तेथे चर्चा झाली. डॉ. फसाटे तक्रार नोंदविण्यासाठी कक्षात गेले. मात्र, वृत्त लिहिस्तोर या घटनेची तक्रार झाली नव्हती.
डॉ. फसाटे सक्तीच्या रजेवर
सामाजिक कार्यकर्ता अमोल इंगळे यांच्यासह मृताच्या नातेवाईकांनी दोषी डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्याकडे रेटून धरली होती. इंगळे यांनी सीएस यांच्या कक्षात ठिय्या मांडून न्यायाची मागणी केली. त्यावेळी त्यांनी डॉ. शशिकांत फसाटे यांना सदर प्रकरणाची चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत असल्याबाबत पत्र काढून नातेवाईकांना दिले. त्यानंतर रोष शांत झाला.
वॉर्डातील रुग्ण भयभीत
मृताच्या नातेवाइकांनी डॉक्टरला मारहाण केल्याने वॉर्डात गोंधळ उडाला होता. आरडाओरड व मारहाण पाहून अन्य रुग्ण भयभित झाले होते. काही नागरिक बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, मृताच्या नातेवाईकांनी वॉर्डातील कुणालाही बाहेर जाऊ दिले नाही. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.