पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:12 IST2021-05-11T04:12:53+5:302021-05-11T04:12:53+5:30
अमरावती : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने पूर्व उच्च प्राथमिक परीक्षा इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ...

पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा स्थगित
अमरावती : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने पूर्व उच्च प्राथमिक परीक्षा इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीची परीक्षा २३ मे रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये निश्चित केली होती. परंतु गत काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता व विद्यार्थ्यी हितास प्राधान्य देऊन ही परीक्षा तूर्त पुढे ढकलण्यात येत असल्याचे आदेश सोमवार, १० मे रोजी परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांचे स्वाक्षरीने येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात धडकले आहेत.
पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा २३ मे रोजी होणार होत्या. या परीक्षेसाठी शिक्षण विभागाने केंद्रप्रमुख, केंद्र पर्यवेक्षकांच्या नियुक्तीच्या सूचनाही दिल्या होत्या. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. केंद्र सरकारने मे महिन्यात या ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते. तरीही परीक्षा परिषदेच्यावतीने पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २३ मे रोजी ऑफलाइन पद्धतीने घेण्याच्या परिपत्रकामुळे पालक-शिक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. शिक्षक संघटनांकडून परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आता शिष्यवृत्तीची परीक्षा तूर्तास पुढे ढकलण्याचा निर्णय परीक्षा परिषदेने घेतला आहे. यासंदर्भातील आदेश काढले आहे. त्यामुळे ही परीक्षा तूर्तास स्थगित करण्यात आली असून, पुढे होणाऱ्या परीक्षेचा दिनांक यथावकाश कळविला जाणार असल्याचे १० मे रोजी काढलेल्या परीक्षा परिषदेच्या आदेशात स्पष्ट केले आहे.