महिला पत्रकारास मारहाण
By Admin | Updated: October 10, 2016 00:11 IST2016-10-10T00:11:49+5:302016-10-10T00:11:49+5:30
नवरात्रौत्सवाचे छायाचित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकारास अंबादेवीतील महिला सुरक्षा रक्षकाने थप्पड लगावली.

महिला पत्रकारास मारहाण
अंबादेवी मंदिरातील घटना : शहर कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल
अमरावती : नवरात्रौत्सवाचे छायाचित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकारास अंबादेवीतील महिला सुरक्षा रक्षकाने थप्पड लगावली. ही घटना रविवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणात पत्रकार पुष्पा जैन यांच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी महिला सुरक्षा रक्षक बाली तायडेविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे.
रविवारी पत्रकार पुष्पा जैन अंबादेवी मंदिरातील उत्सव व यात्रेच्या छायाचित्रीकरणासाठी गेल्या होत्या. त्या व्हिडीओ कॅमेऱ्याने मंदिर परिसरातील भाविकांचे चित्रिकरण करीत असताना तेथील महिला सुरक्षा रक्षक बाली तायडे यांनी पुष्पा यांना छायाचित्रिकरणासाठी मज्जाव करून वाद केला. वाद उफाळून आल्यावर सुरक्षा रक्षक तायडे यांनी पुष्पा यांना मारहाण सुरु केली. त्यामुळे गोंधळ उडाला.
हा वाद सोडविण्यासाठी भाविकांनी धाव घेतली. मात्र, सुरक्षा रक्षक भाविकांनाही जुमानत नव्हती. अखेर पुष्पा जैन यांनी शहर कोतवाली पोलीस ठाणे गाठून तायडेविरूद्ध तक्रार नोंदविली. दरम्यान अंबादेवी संस्थानच्या विश्वस्तांनी मध्यस्थी करून वाद मिटविण्याचे प्रयत्न सुरू केले. पण, वाद चिघळतच गेला.
तक्रार होऊ नये, याकरिता त्यांनी प्रयत्न केले. मात्र, पुष्पा जैन त्यांच्या मतावर ठाम असल्यामुळे त्यांनी अखेर सुरक्षा रक्षकाविरूद्ध तक्रार नोंदविली. याप्रकरणात पोलिसांनी महिला सुरक्षारक्षक तायडेविरूद्ध भादंविच्या कलम ३२३, ५०४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. अंबादेवी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी महिला सुरक्षा रक्षकाला कामावरून काढून टाकल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)