वाहनाच्या धडकेत मादी बिबट ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 23:52 IST2018-05-08T23:51:37+5:302018-05-08T23:52:05+5:30
अमरावती ते चांदूर रेल्वे मार्गावर रस्ता ओलांडताना एका तीन वर्षीय मादी बिबटाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ती जागीच ठार झाली. ही घटना सोमवारी रात्री २ च्या सुमारास घडली.

वाहनाच्या धडकेत मादी बिबट ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अमरावती ते चांदूर रेल्वे मार्गावर रस्ता ओलांडताना एका तीन वर्षीय मादी बिबटाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ती जागीच ठार झाली. ही घटना सोमवारी रात्री २ च्या सुमारास घडली.
वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या अमरावती ते चांदूर रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. सध्या उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याच्या शोधात वन्यजीव रस्ता ओलांडतात. सोमवारी रात्री २ वाजताच्या सुमारास पोहरानजीक मेंढी फार्मजवळ रस्ता ओलांडताना एका मादी बिबटाला अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिल्याने ती जागीच ठार झाली. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी एस.झेड. काझी, वर्तुळ अधिकारी विनोद कोहळे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली व पंचनामा नोंदविला. जबर धडक बसल्याने बिबट्याचे तोंड पूर्णपणे फाटलेले तसेच पुढील दोन्ही पाय पूर्णपणे निकामी झाले. धडकेच्या जागेपासून नंतर बिबट रस्त्यावर १३ फूट अंतरावर जाऊन पडला होता. याप्रकरणी वनगुन्हा क्र. ११/२२ जारी करण्यात आला. वर्तुळ अधिकारी विनोद कोहळे व फ्रेजरपुरा पोलीस वाहनांचा शोध घेत आहेत.
शवविच्छेदन
पोहरा मार्गावर ठार झालेल्या मादी बिबटाचे अमरावती येथे तीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. यावेळी वनविभागाचे अधिकारी हजर होते.
भडाग्नी
बिबट हा अनुसूची १ चा प्राणी असल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत वर्ग १ अधिकाºयांच्या उपस्थितीत उपवनसंरक्षक हेमंत मीणा, सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. झेड. काझी यांच्यासमोर त्याला जाळण्यात आले.