प्रेमीयुगुलाने पकडली महिला पोलीसची कॉलर
By Admin | Updated: February 7, 2017 00:13 IST2017-02-07T00:13:07+5:302017-02-07T00:13:07+5:30
अॅन्टी रॉबरी पेट्रोलिंग स्कॉडने प्रेमीयुगुलांना पकडून चौकशी केली असता तरुणीने महिला पीएसआयची कॉलर पकडून हुज्जत घातली.

प्रेमीयुगुलाने पकडली महिला पोलीसची कॉलर
वडाळी खदानीतील घटना : युवकाविरुद्ध गुन्हा
अमरावती : अॅन्टी रॉबरी पेट्रोलिंग स्कॉडने प्रेमीयुगुलांना पकडून चौकशी केली असता तरुणीने महिला पीएसआयची कॉलर पकडून हुज्जत घातली. ही घटना सोमवारी सकाळी वडाळी खदान परिसरात घडली. या प्रकरणात फे्रजरपुरा पोलिसांनी आरोपी तरुण सुमित अरुण थोरात (२५,रा. जनता कॉलनी, गोपाल नगरजवळ) याला ताब्यात घेतले.
अॅन्टी रॉबरी पेट्रोलिंग स्कॉडमधील पीएसआय शीतल निमजे, पोलीस शिपाई अमोल व अन्य पोलीस पथक सोमवारी वडाळी मार्गावर पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान त्यांना एका दुचाकीस्वार तरुणासोबत दोन मुली बोलत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्या मुलींची चौकशी केली. पोलिसांनी त्या प्रेमीयुगुलांना दुचाकीची कागदपत्रे मागितले असता पोलिसांसोबतच उद्धटपणे बोलण्यास सुरुवात केली.
पोलिसांशी हुज्जत घालून एका मुलीने चक्क पीएसआय शीतल निमजे यांची कॉलर पकडली व तरुण सुमितने पोलीस शिपाई अमोल यांना बुक्की सुध्दा मारली. हा प्रकार घडताच पोलिसांनी सुमितसह दोन्ही मुलींना ताब्यात घेतले.
तिघांनाही फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. याप्रकरणात शितल निमजे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सुमित थोरातविरुध्द भादंविच्या कलम ३५३, २९४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. (प्रतिनिधी)