दारूबंदीसाठी महिला आक्रमक

By Admin | Updated: June 22, 2014 23:47 IST2014-06-22T23:47:25+5:302014-06-22T23:47:25+5:30

सर्रास सुरू असलेल्या दारूविक्रीचे दुष्परिणाम भोगणाऱ्या महिलांनी आक्रमक पवित्रा घेऊन रविवारी मुख्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करीत गावातील अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

Female aggressor for pistol | दारूबंदीसाठी महिला आक्रमक

दारूबंदीसाठी महिला आक्रमक

रास्ता रोको : ठाणेदारांच्या आश्वासनानंतर तणाव निवळला
किरण होले - थिलोरी
सर्रास सुरू असलेल्या दारूविक्रीचे दुष्परिणाम भोगणाऱ्या महिलांनी आक्रमक पवित्रा घेऊन रविवारी मुख्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करीत गावातील अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. प्रकरण चिघळत असल्याचे पाहून दर्यापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन महिलांची समजूत काढली व दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर महिला शांत झाल्या.
दर्यापूर तालुक्यातील थिलोरी येथे गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारूविक्री सुरू आहे. त्यामुळे गावातील वातावरण बिघडत चालले आहे. घराघरांमध्ये कौटुंबिक कलह वाढला असून गावातील ताणतणावही वाढत आहेत. गावातील तरूण व्यसनाधीन होत चालल्याने अवैध दारूविक्रीवर अंकुश लावण्याची मागणी गावातील महिलांनी दारूविक्रीवर अंकुश लावण्याच्या मागणीसाठी दर्यापूर पोलीस ठाण्यात निवेदनही दिले होते. परंतु पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे गावातील अवैध दारूविक्रेत्यांचे मनोेबल वाढतच गेले. आणखी काही लोकांनी नव्याने दारूविक्रीचा व्यवसाय सुरू केला. गेल्या दोन महिन्यांत दारूच्या आहारी गेलेल्या दोन पुरूषांनी आत्महत्या केल्याने दोन कुटुंब उद्ध्वस्त झालेत. त्यामुळे गावातील १०० ते २०० संतप्त महिलांनी मुख्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात पुरूषांचाही सहभाग होता. वाहने अडविल्याने मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दर्र्यापूर पोलिसांना या आंदोलनाची माहिती मिळताच ठाणेदार पवार यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. परंतु महिला काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हत्या. दोन महिन्यांपूर्वी पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनावर पोलिसांनी काहीही कारवाई का केली नाही? असा सवाल यावेळी महिलांनी ठाणेदारांना केला. ठाणेदार पवार यांनी महिलांचे म्हणणे ऐकून घेतले व अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याचे ठोस आश्वासन दिले. त्यानंतर महिलांनी हे आंदोलन मागे घेतले. आंदोलनात संगीता चोरपगार, राजकन्या वाकपांजर, सुनीता वाकपांजर, रेणुका वाकपांजर, सुनंदा वाकपांजर व गावातील शेकडो महिला-पुरूष सहभागी झाले होते.

Web Title: Female aggressor for pistol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.