फेरीवाल्यांचा महापालिकेवर हल्लाबोल
By Admin | Updated: July 17, 2016 00:02 IST2016-07-17T00:02:07+5:302016-07-17T00:02:07+5:30
दहा दिवसांपासून सुरू असलेली अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई तातडीने थांबवावी, या मागणीसाठी शनिवारी शेकडो फेरीवाल्यांनी महापालिकेवर हल्लाबोल केला.

फेरीवाल्यांचा महापालिकेवर हल्लाबोल
सशस्त्र पोलिसांनी पिटाळले : अव्यवहार्य मागण्या फेटाळल्या, पाच तास राजकमल चौक ठप्प
अमरावती : दहा दिवसांपासून सुरू असलेली अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई तातडीने थांबवावी, या मागणीसाठी शनिवारी शेकडो फेरीवाल्यांनी महापालिकेवर हल्लाबोल केला.
मनपाच्या प्रवेशद्वारासमोर पाच तास ठिय्या दिल्यानंतरही त्यांच्या मागण्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. दुपारी ५ वाजताच्या सुमारास आंदोलकांपैकी काहींनी रेटारेटी केल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केला व क्षणातच शेकडो फेरीवाले पांगले. त्यानंतर आयुक्तांशी झालेली चर्चा निष्फळ ठरली. लगोलग नवगर्जना हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष गणेश मारोडकर यांना अटक करण्यात आली व आंदोलन संपुष्टात आले. महापालिकेने पोलिसांच्या सहकार्याने चालविलेली अतिक्रमण निर्मूलन मोहिम नियमबाह्य असल्याचा आरोप करत शनिवारी नवगर्जना हॉकर्स संघटनेच्या नेतृत्वात दुपारी १२ वाजता मोर्चा काढण्यात आला. प्रचंड घोषणाबाजी करत सुमारे ५०० फेरीवाले महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धडकले. मात्र आधीच तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना तेथेच रोखल्याने फेरीवाल्यांनी मुख्य रस्त्यावर ठिय्या दिला. ज्या ठिकाणी व्यवसाय करतो आहे, त्याच ठिकाणी व्यवसाय करु द्यावा, दूरवरच्या हॉकर्स झोनमध्ये गेल्यास व्यवसाय होणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. महापालिकेच्या कारवाईला सुल्तानी ठरवत ही कारवाई तातडीने थांबवावी, पुन:सर्व्हेक्षण करण्यात यावे, नवगर्जना हॉकर्स संघटनेकडून हॉकर्सची यादी घेवून स्मार्टकार्ड द्यावे, अशा पूरक मागण्या फेरीवाल्यांनी केल्या. तथापि हे सर्व करण्यापूर्वी अतिक्रमण मोहीम थांबविण्यात यावी, अशी त्यांची मुख्य मागणी होती. प्रशासनाकडून ती नामंजूर करण्यात आली. दिवसभर प्रशासन आणि आंदोलकांमध्ये नगरसेवकांच्या माध्यमातून चर्चेच्या फैरी झडल्या. मात्र कुठलाही तोडगा निघाला नाही. घोषणाबाजी आणि निदर्शने सुरु असतांना दुपारी ५ च्या सुमारास पोलिसांनी गणेश मारोडकर यांना बाजूला नेऊन आंदोलन संपविण्याची विनंती केली. त्याचवेळी काही आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने रेटारेटी केली. त्यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला व अवघ्या पाच मिनिटांमध्ये पाच तासांच्या आंदोलनाची इतिश्री झाली. पोलीस उपायुक्त मोरेश्वर आत्राम यांनी पोलीस यंत्रणेचे नेतृत्व केले. संपूर्ण मार्गावर बॅरिकेट्स लावण्यात आले. दोन एसीपी, आठ पेक्षा अधिक निरीक्षक, उपनिरीक्षक व पोलिसांचा सशस्त्र ताफा आंदोलनस्थळी तैनात होता. ११ हॉकर्स झोन निश्चित केले, तर ४७ प्रस्तावित आहेत. अतिक्रमण कारवाई थांबणार नाही, अशी ठाम भूमिका आयुक्तांनी घेतली. दालनात चर्चा फिस्कटल्यानंतर मारोडकरला कोतवाली पोलिसांनी अटक केली व हायव्होल्टेज ड्रामा संपला. (प्रतिनिधी)
महापालिका आयुक्तांनी दबावतंत्र झुगारले
महापालिका राबवत असलेली अतिक्रमण मोहीम तातडीने थांबवावी, या मागणीसाठी शनिवार दुपारपासून फेरीवाल्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या दिला. प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. काही नगरसेवक आणि राजकीय व्यक्तींकडून दबावतंत्र वापरण्यात आले. तथापि दबावतंत्राला भीक न घालता अतिक्रमण मोहीम सुरूच राहणार, या भूमिकेवर आयुक्त हेमंत पवार ठाम राहिले. मागील दहा दिवसांपासून अतिक्रमणाबाबत आयुक्तांना विरोधाला सामोरे जावे लागत आहे. मात्र पवारांनी शहर अतिक्रमणमुक्त करण्याचा विडा उचलला आहे.
पोलिसांकडून चौफेर नाकाबंदी
४०० ते ५०० च्या संख्येत असणाऱ्या फेरीवाल्यांना महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले. त्यावेळी फेरीवाल्यांनी प्रवेशद्वारासमोर ठिय्या देत जयस्तंभकडे जाणारा मार्ग अडविला. तब्बल पाच तास या मार्गावरची वाहतूक बंद होती. फेरीवाल्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी चौफेर नाकाबंदी केली. वज्र, वरूणसह क्यूआरटी व सशस्त्र पोलीस दल तैनात करण्यात आले. एकवेळ तर आंदोलकांपेक्षा पोलिसांची कुमक अधिक दिसून आली. दुपारनंतर आंदोलकांमधील अनेकांनी परतीचा मार्ग पत्करला.
पवारांनी बजावले
शहरातील जे हॉकर्स मनपाच्या सर्व्हेक्षणापासून वंचित राहिले, त्यांचा तातडीने सर्व्हे करण्यात यावा. तत्पूर्वी अतिक्रमण मोहीम थांबविण्यात यावी, यासाठी शेकडो फेरीवाल्यांनी पाच तास ठिय्या दिला. नवगर्जना हॉकर्स संघटनेचे गणेश मारोडकर यांनी आयुक्तांशी चर्चा केली. मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. रस्तावर कुणालाही व्यवसाय करता येणार नाही, असे आयुक्तांनी बजावले. तासभर चर्चा झाल्यानंतरही तोडगा न निघाल्याने फेरीवाल्यांचे नेते रिक्त हस्ते परतले. सोमवारी पुन्हा अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली जाणार आहे.
महापालिकेने निश्चित केलेल्या हॉकर्स झोनमध्ये नोंदणीबद्ध फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मुभा आहे. तथापि जो जेथे व्यवसाय करतो तेथेच त्याला जागा देणे शक्य नाही. अतिक्रमण मोहीम अव्याहतपणे सुरूच राहील.
- हेमंत पवार,
आयुक्त, महापालिका