मरणाच्या भीतीने गिरगुटीत एकानेच घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:14 IST2021-05-06T04:14:18+5:302021-05-06T04:14:18+5:30
लोकमत विशेष फोटो ०५एएमपीएच२५, कॅप्शन - शिबिरात लस टोचण्यासाठी पोहचलेली एकमेव लाभार्थी ०५एएमपीएच२५ - आदिवासींचे प्रबोधन करताना वासंती मंगरोळे ...

मरणाच्या भीतीने गिरगुटीत एकानेच घेतली लस
लोकमत विशेष
फोटो ०५एएमपीएच२५, कॅप्शन - शिबिरात लस टोचण्यासाठी पोहचलेली एकमेव लाभार्थी
०५एएमपीएच२५ - आदिवासींचे प्रबोधन करताना वासंती मंगरोळे व दयाराम काळे
नरेंद्र जावरे - चिखलदरा (अमरावती) : तालुक्यातील गिरगुटी गावात मंगळवारी लसीकरण शिबिरात नव्वद जणांचे लसीकरण झाले. त्यापैकी गावातील एकमेव व्यक्तीने महत्प्रयासाने लस घेतली. उर्वरित ८९ नागरिक वरूड, अंजनगाव सुर्जी, परतवाडा, अचलपूर आदी भागातून येऊन लस घेऊन निघून गेले. देशभर कोरोना लसीसाठी मारामार सुरू असताना, मेळघाटात मात्र लस घेतल्याने माणसाचा मृत्यू होतो, ही अफवा चार दिवसांपासून दोनशेपेक्षा अधिक गावांत पसरली. यामुळे आदिवासींनी लस टोचून घेणे बंद केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
आंबापाटी गावातील काही नागरिकांनी पसरविलेली मृत्यूची अफवा मेळघाटच्या दोनशेपेक्षा अधिक गावांत पोहोचली. यामुळे आदिवासी कोरोनाची लस घेण्यास तयार नाहीत. हा गैरसमज निघून जावा, यासाठी या परिसरातील जिल्हा परिषद सदस्य वासंती मंगरोळे व जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती दयाराम काळे यांनी गिरगुटी गावात मंगळवारी लसीकरण शिबिर आयोजित केले. आरोग्य विभागाने त्याची तयारीही केली. मंडप टाकण्यात आला. परंतु, दोन तास झाले तरीही एकही आदिवासी लस घ्यायला तयारच नसल्याचे उघड झाले. त्यामुळे उपस्थित अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधींनी संवाद साधून कारण शोधले तेव्हा त्यांनाही धक्काच बसला. लस घेतल्याने माणूस मरतो. त्यामुळे आम्ही लस घेत नसल्याचे आदिवासींनी त्यांनी सांगितले.
बॉक्स
अथक प्रयत्नानंतर एकानेच घेतली लस, ८९ आले तालुक्याबाहेरील
गिरगुटी गावात मंगळवारी एकूण ९० जणांनी लस घेतल्याची नोंद झाली. प्रत्यक्षात त्या गावातील एकच आदिवासीने ही लस घेतली, तर उर्वरित अचलपूर, परतवाडा, वरूड, अंजनगाव अशा तालुक्याबाहेरील लोकांनी ऑनलाईन नोंदणी करून आदिवासी पाड्यात जाऊन लस घेतली.
बॉक्स
जनजागृती मोहीम आवश्यक
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात १६ हून अधिक गावे ‘हॉट स्पॉट’ ठरली आहेत. दुसरीकडे आदिवासी लस घ्यायला तयार नसल्याने आरोग्य यंत्रणेपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेमार्फत गावागावांत कोरोना लसीसंदर्भात जनजागरण मोहीम करणे गरजेचे ठरले आहे.
कोट
लस घेतल्याने माणूस मरतो, अशी अफवा मेळघाटात पसरली आहे. गिरगुटी गावात मंगळवारी लसीकरणात गावातील एकमेव लाभार्थी होता.
- सतीश प्रधान, तालुका वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा
कोट
गिरगुटीत गावातील नागरिकांना कोरोना लसीसंदर्भात संपूर्ण माहिती दिली. परंतु, अथक प्रयत्नानंतर केवळ एकानेच लस घेतली. प्रत्येक गावात आता जिल्हा परिषद मार्फत जनजागृती मोहीम सुरु करीत आहोत. अफवांना थारा देऊ नका, असे आवाहनही करण्यात आले आहे.
- दयाराम काळे, समाजकल्याण सभापती
जि. प. अमरावती