एफडीए हप्तेखोर; मनपा-पोलिसांचीही साथ
By Admin | Updated: April 29, 2016 00:13 IST2016-04-29T00:13:45+5:302016-04-29T00:13:45+5:30
अन्न, औषधी प्रशासन विभागाच्या हप्तेखोर प्रवृत्तीमुळेच घातक रसायनांचा वापर करणाऱ्या फळविक्रेत्यांचे मनोबल वाढले आहे.

एफडीए हप्तेखोर; मनपा-पोलिसांचीही साथ
सुनील देशमुख : विषयुक्त फळांबाबत आता मंत्रालयातच तक्रार
अमरावती : अन्न, औषधी प्रशासन विभागाच्या हप्तेखोर प्रवृत्तीमुळेच घातक रसायनांचा वापर करणाऱ्या फळविक्रेत्यांचे मनोबल वाढले आहे. शहरात ठिकठिकाणी कॅल्शियम कार्बाईडचा वापर होत असल्याची माहिती असूनही कारवाई केली जात नाही. अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या या बोटचेप्या भूमिकेबाबत आता थेट मंत्रालयातच तक्रार करणार आहे, अशी माहिती आ. सुनील देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
शहरात सर्रास कॅल्शियम कार्बाईड या घातक रसायनाचा वापर करून आंबे, केळी व इतर फळे पिकविली जाताहेत. ही विषयुक्त फळे सर्रास लोकांच्या घराघरात पोहोचत आहेत. हे वास्तव ‘लोकमत’ने उघड करतानाच आ. सुनील देशमुख यांच्याकडून अपेक्षाही व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने ते ‘लोकमत’शी बोलत होते.
सुनील देशमुखांचे पत्र
१२ एप्रिलच्या अंकात ‘आंब्यासोेबत आजार मोफत’ हे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर आ. सुनील देशमुख यांनी अन्न व औषधी प्रशासन विभागाला २० एप्रिल रोजी पत्र देऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणीदेखील केली. धास्तावलेल्या एफडीए अधिकाऱ्यांनी बाजार समितीतील आठ अधिकृत फळविक्रेत्यांच्या प्रतिष्ठानांवर धाडी टाकून तपासणी केली.
हप्तेखोरीमुळेच कारवाई नाही
अमरावती : एका फळविक्रेत्याकडे कॅल्शियम कार्बाईडच्या पुड्या जप्त करण्यात आल्या होत्या. १२० किलो आंब्यांचा साठा नष्ट केला होता. शहरात ठिकठिकाणी असलेल्या फळविक्रेत्यांकडून कॅल्शियम कार्बाईडयुक्त फळांची विक्री होते. एफडीए निष्क्रीय आहेच. तथापि महापालिका आणि पोलीसदेखील हप्तेखोरीसाठी त्यांच्यावर कारवाई करीत नाहीत, असे स्पष्ट मत सुनील देशमुख यांनी व्यक्त केले.