पूर्वपरवानगीशिवाय ‘टीसी’ न देण्याचा फतवा!
By Admin | Updated: May 1, 2016 00:06 IST2016-05-01T00:06:50+5:302016-05-01T00:06:50+5:30
महापालिकेचे शिक्षणाधिकारी विजय गुल्हाने यांनी काढलेला पूर्णपरवानगीशिवाय ‘टीसी’ न देण्याचा फतवा वजा आदेश रद्द करावा, ....

पूर्वपरवानगीशिवाय ‘टीसी’ न देण्याचा फतवा!
आयुक्तांचे निवेदन : मनपा शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकात जुंपली
अमरावती : महापालिकेचे शिक्षणाधिकारी विजय गुल्हाने यांनी काढलेला पूर्णपरवानगीशिवाय ‘टीसी’ न देण्याचा फतवा वजा आदेश रद्द करावा, अशी मागणी मुख्याध्यापक संघाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
अमरावती जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या नेतृत्वात शनिवारी मुख्याध्यापकांनी उपायुक्तांची भेट घेतली. टीसी देण्याचे मुख्याध्यापकांच्या अधिकारावर तात्पुरती स्थगिती आणण्यात आली आहे. आपल्या पूर्वपरवानगीशिवाय कुणालाही टीसी देण्यात येऊ नये, टीसी बुक सील करून ठेवावेत, एकही टीसी द्यायची नाही, अशा प्रकारचा आदेश मनपा शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना दिल्याचा आरोप मुख्याध्यापक संघाने केला आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना दिलेले टीसी न देण्याचे आदेश वा ती कृती आरटीई कायद्याच्या विरोधात आहे. या कायद्यानुसार मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांची टीसी रोखता येत नाही. विद्यार्थी आणि पालकांनी टीसीकरिता अर्ज दिल्यानंतर मुख्याध्यापकांनी टीसी न देणे, हे आरटीई कायद्याला सुसंगत नाही. त्या अनुषंगाने टीसी न देण्याचा आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एन. टी. अर्डक यांनी आयुक्तांच्या नावे दिलेल्या निवेदनातून केली आहे. महापालिकेच्या शाळेतून अन्य शाळांमध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य शिक्षणाधिकारी गुल्हाने यांच्या टिसी न देण्याच्या फतव्यामुळे धोक्यात आल्याचा आरोप अर्डक यांच्यासह मुख्याध्यापकांनी केला आहे. (प्रतिनिधी)
मुख्याध्यापक
संघाचा आरोप
‘टीसी बुक सील करून ठेवा, एकही टीसी द्यायची नाही, पोच द्या’, असा संदेश महापालिकेचे शिक्षणाधिकारी विजय गुल्हाने यांनी मुख्याध्यापकांना दिला असल्याचा दावा अमरावती जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने केला आहे.
तो आदेश रद्द करावा
अमरावती महापालिका क्षेत्रात लोकसंख्येच्या प्रमाणात आधीच शाळांची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रवेशाची मारामार आहे. विद्यार्थी मिळत नाही, असे असताना नवीन तुकड्या सुरू करणे योग्य नाही. मागणी नसताना २४ फेब्रुवारी २०१६ च्या पत्रानुसार सरसकट वर्ग ८ वा सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. ते रद्द करावेत, अशी मागणी मुख्याध्यापक संघाने केली आहे.
३४ मुख्याध्यापकांच्या स्वाक्षऱ्या
महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनावर शिवाजी मराठी हायस्कूल, जीवन विकास विद्यालय, अरुणोदय इंग्लिश स्कूल, रामकृष्ण क्रीडा आश्रमशाळा, न्यू हायस्कूल मेन, भाग्यश्री विद्यालय यासह शहरातील ३४ नामांकित शाळांच्या मुख्याध्यापकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मनपाकडे ६६ शाळा
अमरावती महापालिकेकडे २९ प्राथमिक, ३२ उच्च प्राथमिक आणि ५ माध्यमिक अशा ६६ शाळांचे व्यवस्थापन आहे. त्यापैकी १९ शाळांमध्ये सेमी इंग्रजीचेच वर्ग सुरू करण्यात आले आहे. मराठी माध्यमांचा ३८, हिंदीच्या १२ तर उर्दू माध्यमाच्या १६ शाळा आहेत.
स्वत:च्या मुलीऐवजी दुसऱ्याच्या मुलीचे लग्न कराल का? मी माझ्या शाळा बंद पडू देणार नाही. आम्ही आमचे बघून घेऊ. मी कुठलेही आदेश काढले नाहीत.
- विजय गुल्हाने,
शिक्षणाधिकारी, मनपा.