मुलाला वडिलांनीच पळविले
By Admin | Updated: February 23, 2015 00:50 IST2015-02-23T00:50:49+5:302015-02-23T00:50:49+5:30
तीन वर्षाच्या पोटच्या गोळ्याला त्याच्या वडिलांनीच विकल्याची तक्रार चिमुकल्याच्या आईने राजापेठ पोलीस ठाण्यात केली आहे.

मुलाला वडिलांनीच पळविले
अमरावती : तीन वर्षाच्या पोटच्या गोळ्याला त्याच्या वडिलांनीच विकल्याची तक्रार चिमुकल्याच्या आईने राजापेठ पोलीस ठाण्यात केली आहे. पती व मुलाच्या शोधार्थ भटकंती करणाऱ्या महिलेने तिची दारूण परिस्थिती पोलिसांसमोर कथन करून चिमुकल्याला परत आणण्याचे केविलवाणे साकडे घातले.
विस्तृत माहितीनुसार चंद्रपूूर येथील मूळ रहिवासी असणारी रुहा (२६) नामक युवतीने चार वर्षांपूर्वी रोशन लवराज कोंडावार याच्याशी ८ मार्च २०११ रोजी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर रुहा पती रोशनसोबत राहात होती. रोशन, त्याची आई आणि रोशन-रूहाच्या संसारवेलीवर उमललेले तीन वर्षाचे गोंडस बाळ कार्तिक असा त्यांचा सुखी संसार होता. शहरात स्वत:चे घर नसल्याने त्यांनी अनेकदा भाडयाची घरे बदलली. चार महिन्यांपूर्वी रुहा तिच्या कुटुंबासमवेत आपल्या पतीसोबत स्थानिक शंकरनगर परिसरातील भाड्याने राहात होती.
पती रोशनच्या मनात स्वत:च्याच पोटच्या गोळ्याविषयी कटकारस्थान शिजत असेल, याची तिळमात्रही कल्पना रूहाला आली नाही. अचानक रोशन तीन वर्षाच्या कार्तिकला घेऊन बेपत्ता झाला. बऱ्याच प्रतीक्षेनंतरही मुलगा व सासूसमवेत गेलेला रोशन न परतल्याने काही तरी काळेबेरे असल्याची बाब रूहाच्या लक्षात आली. आपल्या मुलाला पतीने पळवून नेल्याचे समजताच रुहा हिने २८ जानेवारी रोजी तत्काळ राजापेठ पोलीस ठाणे गाठले. लग्नापासूनचा सर्व प्रकार रुहा हिने पोलिसांना सांगितला. मात्र, अद्याप मुलाचा शोध लागला नाही. अनेकदा तिने राजापेठ पोलिसांकडे चौकशी केली. मात्र, आता पोलिसांकडूनही उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी रुहाला रोशनचा फोन आला होता. त्यावेळी त्याने कार्तिकला विक्री करण्यासाठी पळून नेल्याचे सांगितले. पती व कार्तिकच्या शोधात रविवारी दुपारी २ वाजता रुहा कृष्णार्पण कॉलनीत भटकंती करताना आढळून आली. त्यावेळी लोकमत प्रतिनिधीसमोर तिने आपबिती मांडली. (प्रतिनिधी)