मनसेच्या कार्यकर्त्यांचे स्मशानभूमीत उपोषण
By Admin | Updated: December 22, 2016 00:39 IST2016-12-22T00:39:09+5:302016-12-22T00:39:09+5:30
तालुका प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा दाखल न घेतल्याने तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ...

मनसेच्या कार्यकर्त्यांचे स्मशानभूमीत उपोषण
योजनांपासून बेदखल : मेळघाटात कर्मचारी बेपत्ता
चिखलदरा : तालुका प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा दाखल न घेतल्याने तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जामली येथे बुधवारपासून चक्क स्मशानभूमितच साखळी उपोषणाला सुरुवात केली.
जामली (आट) गावात निराधार योजनेचा लाभ आदिवासींना न देता वंचित ठेवण्यात आले आहे. पंचायत समिती विशेष घटक योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या साहित्य वाटपाची यादी ग्रापं. कार्यालयात लावण्यात यावी, कृषीसेवकाने आठवड्यातून एक दिवस उपस्थित राहून आदिवासी शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवावी, मग्रारोहयो अंतर्गत जॉबकार्डधारकांना रोजगार हमी योजनेची कामे द्यावीत, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात औषधीसाठा उपलब्ध करून देण्यात यावा, आदिवासी विभागामार्फत कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचविण्यात यावी, ग्रामसेवक, पटवारी, शिक्षक सतत बेपत्ता राहात असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, इंटरनेट सुविधा, मोबाईल टॉवर उभारण्यात यावे, विद्युत रिडिंग न घेता देयके काढणे बंद करावे, आदी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी तसेच धारणी व चिखलदरा येथील तहसीलदारांना वारंवार निवेदन देण्यात आले. मात्र, त्याकडे लक्ष देण्यात आले नाही.
परिणामी मनसेचे मणिराम दहिकर, प्रवीण बेलसरे, रामकिसन सेलुकर, दीपक भुसूम, गौतम देवगे, प्यारेलाल दहीकर, रामलाल कास्देकर, अरविंद दहीकर, रायबाबू दहीकर, श्रीराम दहीकर, नंदलाल बेलसरे, किरण सावरकर, सूर्या तोटे आदींनी बुधवारपासून जामली येथील स्मशानभूमित उपोषण सुरू केले आहे. मनेसेचे प्रियेश अवघड व अंकुश इंगळे यांच्या नेतृत्वात सुरु झालेल्या उपोषणाची प्रशासनाने तत्काळ दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. आदिवासींच्या हितार्थ सुरू करण्यात आलेल्या या उपोषणामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून हा औत्सुक्याचा विषय ठरला आहे.
परिसरात संताप
आदिवासींपर्यंत योजनांचा लाभ पोहोचत नाही. अधिकारी, कर्मचारी बेपत्ता राहतात. प्रशासनाला निवेदन देऊन दखल घेतली जात नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.