शेतकऱ्यांना साडेतीन कोटींची पीक भरपाई
By Admin | Updated: September 27, 2014 23:07 IST2014-09-27T23:07:32+5:302014-09-27T23:07:32+5:30
राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत सन २०१३-१४ हंगामाकरिता ६८ हजार ४९ शेतकऱ्यांनी २ कोटी ५२ लाख २६ हजार रूपयांचा विमा हप्ता भरला. जिल्ह्यात मागील वर्षी ओला दुष्काळ, अवकाळी पाऊस

शेतकऱ्यांना साडेतीन कोटींची पीक भरपाई
अमरावती : राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत सन २०१३-१४ हंगामाकरिता ६८ हजार ४९ शेतकऱ्यांनी २ कोटी ५२ लाख २६ हजार रूपयांचा विमा हप्ता भरला. जिल्ह्यात मागील वर्षी ओला दुष्काळ, अवकाळी पाऊस व गारपीटमुळे सरासरी उत्पादनात ५० टक्क्यांवर घट आली असताना केवळ ११ टक्के शेतकऱ्यांना विम्याचे कवच लाभले. उर्वरित शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.
अपुरा पाऊस, पावसातील खंड व अती पाऊस या तीन हवामान घटकाच्या धोक्यापासून संरक्षण देणारी पीक विमा योजना ही राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील कापूस व सोयाबीन, मूग, उडीद पिकांचा समावेश आहे. बिगर कर्जदारांना ऐच्छीक असणारी ही योजना मात्र कर्जदार शेतकरी सभासदांना सक्तीची होती. यामुळे शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामधून विमा हप्त्यापोटी रक्कम वळती करण्यात आली. बहुतांश शेतकरी पीककर्ज घेतात. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांचा विमा परस्पर काढला गेला. मागील वर्षी ओला दुष्काळसदृश स्थिती होती. यामुळे शेती पिकांचे ५० टक्क्यांवर नुकसान झाले. प्रत्यक्षात नुकसान भरपाई ही एकूण विमा धारकांच्या केवळ ११ टक्के प्रमाणात शेतकऱ्यांनाच मिळाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
अमरावती उपविभागांतर्गत अमरावती, भातकुली, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे व नांदगाव (खंडेश्वर) तालुक्यात ३२ हजार ९४२ शेतकऱ्यांनी विमा हप्त्यात भरणा केला. यापैकी ४९२ शेतकऱ्यांना ९ लाख ४८ हजार ७१० रूपयांचा लाभ मिळाला आहे. मोर्शी उपविभागांतर्गत वरूड, मोर्शी, तिवसा, चांदूरबाजार तालुक्यातील २० हजार २१० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला.
प्रत्यक्षात २ हजार २७ शेतकऱ्यांना ८२ लाख ५९ हजार ५८७ रूपयांचा पीक विम्याचा लाभ मिळाला. अचलपूर उपविभागांतर्गत अचलपूर, अंजनगाव, दर्यापूर, धारणी, चिखलदरा तालुक्यातील १४ हजार ८९७ शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता भरला. प्रत्यक्षात ५ हजार १९७ शेतकऱ्यांना २ कोटी ५३ लाख ६५ हजार ६८९ रूपयांचा लाभ मिळाला आहे.
उर्वरित ८९ टक्के शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. (प्रतिनिधी)